तळाशी येथे बाळंतिणीचा बाराव्या दिवशी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:53+5:302021-04-11T04:23:53+5:30
शिरगाव : बाळंतपणानंतर अवघ्या बारा दिवसांनी अचानक ताप आलेल्याचे निमित्त होऊन तळाशी, माजगाव (ता. राधानगरी) येथील ऋतुजा राहुल बोंगार्डे ...
शिरगाव : बाळंतपणानंतर अवघ्या बारा दिवसांनी अचानक ताप आलेल्याचे निमित्त होऊन तळाशी, माजगाव (ता. राधानगरी) येथील ऋतुजा राहुल बोंगार्डे (वय २१) या विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआरमध्ये झाली आहे.
याबाबतची माहिती अशी, तळाशी येथील राहुल बोंगार्डे यांचे गेल्यावर्षी चांदेकरवाडी येथील गोविंद खोत यांच्या मुलीशी विवाह झाला होता. त्यावेळीही कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर विवाह अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाला होता. बारा दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात ऋतुजाने एका मुलींला जन्म दिला होता. घरात थोरल्या भावाला दोन मुले त्यामुळे मुलगी जन्माला आल्यामुळे पती राहुलसह आई-वडिलांना व नातेवाइकांना आनंद झाला होता. दवाखान्यातून घरी जाण्यासाठी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर दहा दिवसांनी परत दाखविण्यासाठी व टाके काढण्यासाठी या असे दवाखान्यात सांगितले होते. माहेरी चांदेकरवाडी येथे गेल्यावर सर्व सुरळीत असतानाच अचानक मंगळवारी रात्री उशिरा ताप आला होता. याची माहिती माहेरच्या मंडळींनी बोंगार्डे कुटुंबीयांना दिली. यावेळी राहुल याने पुन्हा त्या दवाखान्यात ऋतुजाला ॲडमिट केले. यावेळी टाके काढून तापाची लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. दोन दिवस उपचार सुरू होते त्यातच शुक्रवारी सायंकाळी अचानक ऋतुजाची तब्येत खालावली म्हणून तिला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण दवाखान्याच्या दारातच तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. रात्री उशिरा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ऋतुजावर तळाशी माजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात पती, सासू, सासरे, दीर, जाऊ, दोन पुतणे व तेरा दिवसांची मुलगी असा परिवार आहे.