HSC Result2024: आम्ही कष्ट करतो तू अभ्यास कर..!, गवंड्याच्या मुलाचं लख्ख यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:56 AM2024-05-22T11:56:51+5:302024-05-22T11:57:56+5:30
कोल्हापूर : वडील गवंडी काम करतात, आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताची असली तरी पालकांनी त्याला कधीही काम करायला दिले ...
कोल्हापूर : वडील गवंडी काम करतात, आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताची असली तरी पालकांनी त्याला कधीही काम करायला दिले नाही. आम्ही कष्ट करतो, तू त्याचे टेंशन घेऊ नको, फक्त अभ्यास कर.. हे आई-वडिलांचे शब्द त्याची प्रेरणा ठरले. त्यांच्या कष्टाचे चीज करत बलभीम प्रकाश कोकाटे याने बारावीत ९४.१७ टक्के गुण मिळवले.
आर. के. नगर येथे राहणारा बलभीम हा कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील दिवसभर गवंडीकाम करतात. काम असेल तिथे त्यांना जावे लागते. आई गृहिणी आहे. तीदेखील लहान-मोठे काम करून कुटुंबाला हातभार लावते. शिवाय मोठी बहीण आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे त्याची व पालकांच्या कष्टाची जाण बलभीमला लहानपणापासूनच होती. एवढे कष्ट होत असतानाही पालक आपल्याला नोकरी, धंदा करून कमवायला सांगण्याऐवजी अभ्यास करायला सांगतात. आम्ही कष्ट करतो तू अभ्यास कर या वाक्याने त्याला आत्मविश्वास दिला.
त्याचे अभ्यासाचे असे काही वेळापत्रक नव्हते. कॉलेजमध्ये प्राध्यापकांचे शिकवणे मन लाऊन ऐकायचे, समजून घ्यायचे आणि घरी त्याचे रिविजन करायचे हा त्याचा दिनक्रम असायचा. रात्रंदिवस जागून असा काही त्याने अभ्यास केला नाही. पण ज्यावेळी अभ्यास करायचा तेंव्हा मन एकाग्र ठेऊन करायचा. त्याला पुढे सीए व्हायचे आहे. त्यासाठी त्याचे फाउंडेशनचे क्लासेस सुरू आहेत.