‘बलभीम’ लिंगनूरचे सचिव रेडेकर निलंबित
By admin | Published: July 4, 2017 06:48 PM2017-07-04T18:48:46+5:302017-07-04T18:48:46+5:30
कोल्हापूर जिल्हा देखरेख संस्थेची कारवाई : मनमानी भोवली
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0४ : लिंगनूर (ता. गडहिग्लज) येथील बलभीम विकास संस्थेचे सचिव सुधाकर गणपती रेडेकर यांच्यावर जिल्हा देखरेख संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी निलंबनाची कारवाई केली.
संस्थेत मोठ्या प्रमाणात हातशिल्लक ठेवून ती स्वत: वापरणे, पगार वर्गणी केडरकडे न भरणे, आदी ठपके चौकशीत रेडेकर यांच्यावर ठेवले होते. सुधाकर रेडेकर हे बलभीम विकास संस्थेत सचिव म्हणून कार्यरत होते; पण जिल्हा देखरेख संस्थेने २४ एप्रिल २०१७ रोजी त्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. या ठिकाणी जितेंद्र प्रकाश फडके यांची नियुक्ती केली होती, त्यांच्याकडे पदभार देण्याबाबतही सूचना केली होती; पण रेडेकर यांनी पदभार देण्यास टाळाटाळ केली.
याबाबत देखरेख संस्थेने त्यांच्याकडे खुलासा मागितला होता. तो देखरेख संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मालगावे यांनी अमान्य केला. रेडेकर यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी गडहिंग्लज सहायक निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपिक एम. व्ही. पाटील यांची नेमणूक केली. त्यांच्या अहवालानुसार रेडेकर यांनी मोठ्या प्रमाणात गैरकारभार केल्याचे निदर्शनास आले.
संस्थेत मोठ्या प्रमाणात हातशिल्लक ठेवून बॅँकेत वेळेवर न भरता ती स्वत: वापरणे, पगार वर्गणी केडरकडे न भरता परस्पर उचल करणे, तसेच दोन विकास संस्थांकडून बोनस उचल करणे, आदी गंभीर ठपके पाटील यांनी चौकशी अहवालात ठेवले आहेत. या अहवालानुसार देखरेख सहकारी संस्था सेवानियम २६ ‘अ’चा रेडेकर यांनी भंग केल्याने त्यांच्यावर जिल्हास्तरीय समितीच्या सभेत निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव झाला.