‘बालगोपाल’ बनले ‘नेताजी’
By admin | Published: April 13, 2016 12:44 AM2016-04-13T00:44:36+5:302016-04-13T00:56:13+5:30
नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा : चुरशीच्या सामन्यात टायब्रेकरवर ५-४ ने प्रॅक्टिसवर मात
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाने चुरशीच्या सामन्यात तुल्यबळ प्रॅक्टिस क्लबचा टायब्रेकरवर ५-४ असा पराभव करत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. ‘प्रॅक्टिस’च्या इंद्रजित मोंडलची हॅट्ट्रिक वाया गेली.
शाहू स्टेडियम येथे मंगळवारी बालगोपाल व प्रॅक्टिस क्लब यांच्यात अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी एकमेकांच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. ‘प्रॅक्टिस’कडून चौथ्या मिनिटाला सचिन बारामतेने हेडद्वारे दिलेल्या पासवर इंद्रजित मोंडलने गोल करत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्यासाठी ‘बालगोपाल’कडून शर्थीचे प्रयत्न सुरू. १४ व्या मिनिटास ‘बालगोपाल’च्या सूरज जाधवच्या पासवर आकाश भोसलेने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर २१ व्या मिनिटाला प्रॅक्टिसकडून इंद्रजित मोंडलने गोल करत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. बालगोपाल संघाने बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यात रोहित कुरणेला अवैधरीत्या अडविल्याबद्दल बालगोपाल संघास फ्री कीक मिळाली. त्यावर महादेव तलवारने मारलेल्या चेंडू प्रॅक्टिसच्या खेळाडूला चाटून थेट गोलजाळ्यात गेला. त्यामुळे सामना पुन्हा २-२ असा बरोबरीत आला. पूर्वार्धात अशी बरोबरीची स्थिती राहिली.
उत्तरार्धात प्रॅक्टिसकडून ४८ व्या मिनिटास इंद्रजित मोंडलने गोल करत आपल्या संघास ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फार काळ टिकली नाही. ५३ व्या मिनिटास बालगोपालच्या आकाश भोसलेने गोल करत सामन्याला कलाटणी देत ३-३ अशी बरोबरी आणली. अखेरपर्यंत ३-३ असा सामना बरोबरीत राहिल्याने मुख्य पंचांनी ‘टायब्रेकर’चा अवलंब केला. त्यात ‘बालगोपाल’कडून रोहित कुरणे, बबलू नाईक, महादेव तलवार, ऋतुराज पाटील, सचिन गायकवाड तर प्रॅक्टिसकडून अमृत हांडे, सुमित घाडगे, प्रतीक बदामे, इंद्रजित मोंडल यांनी गोल केले. त्यामुळे सामना बालगोपाल संघाने ५-४ असा जिंकत ‘नेताजी चषका’वर आपले नाव कोरले.
विजेत्या संघास युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते ५१ हजार रोख व चषक प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योजक चंद्रकांत जाधव, जीतूभाई गांधी, चेतन वसा, सचिन झंवर, आकाश देशमुख, माणिक मंडलिक, राजू साळोखे, प्रदीप साळोखे आदी उपस्थित होते.
फुटबॉल हंगामात हुल्लडबाजी आणि खेळाडूंत हाणामारी यावरून स्पर्धेलाच परवानगी मिळत नव्हती. विनंती, शिष्टमंडळ भेटून हंगाम कसाबसा सुरू झाला. मात्र, मंगळवारी प्रॅक्टिस व बालगोपाल यांच्यातील सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये हुल्लडबाजीला सुरुवात केली.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटविला. यादरम्यान मैदानात ‘प्रॅक्टिस’च्या योगेश कदमने मुख्य पंचांना धक्काबुक्की केली. त्यावर पंचांनी त्याला रेडकार्ड दाखवत मैदानातून बाहेर काढले. या प्रकाराने जर फुटबॉल हंगाम संपुष्टात आला तर काय करायचे. त्यामुळे फुटबॉलशौकिनांत या प्रकाराने नाराजी पसरली.