‘बालगोपाल’ची ‘शिवनेरी’वर मात
By admin | Published: March 27, 2015 10:33 PM2015-03-27T22:33:52+5:302015-03-28T00:06:46+5:30
दसरा कप फुटबॉल स्पर्धा : रोहित कुरणेची हॅट्ट्रिक
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाने शिवनेरी स्पोर्टस् क्लबचा ५-० असा धुव्वा उडवत दसरा कप फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यात ‘बालगोपाल’च्या रोहित कुरणेने अप्रतिम खेळ करत हॅट्ट्रिक साधली.छत्रपती शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी बालगोपाल तालीम मंडळ व शिवनेरी स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘बालगोपाल’चेच वर्चस्व राहिले. ‘बालगोपाल’कडून ऋतुराज पाटील, जयकुमार पाटील, रोहित कुरणे, अक्षय मंडलिक, सचिन गायकवाड, बबलू नाईक यांनी सातत्याने ‘शिवनेरी’च्या गोलक्षेत्रात गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. यात चेंडू कधी गोलपोस्टला, तर कधी गोलपोस्टवरून बाहेर जात होता.‘शिवनेरी’च्या कुमार पचिंद्रे याने पेनल्टी क्षेत्रात चेंडू हाताळल्याबद्दल मुख्य पंच प्रदीप साळोखे यांनी बालगोपाल संघास पेनल्टी दिली. यावर जयकुमार पाटीलने पेनल्टी किक बाहेर मारली. यामुळे गोल करण्याच्या अनेक संधी येऊनही ‘बालगोपाल’ला गोल करण्यात अपयश येत होते. अखेर ४० व्या मिनिटाला ‘बालगोपाल’च्या ऋतुराज पाटीलने छोट्या डी मध्ये गोल करण्यासाठी जोरदार फटका मारला. मात्र, तो खांबाला अडला. यामुळे परतून आलेला चेंडू बबलू नाईक याने अलगद गोल जाळ्यात धाडत १-० अशी आघाडी आपल्या संघास मिळवून दिली. ‘शिवनेरी’कडून अर्जुन साळोखे, तौसिफ बाणदार, युवराज साळोखे, कुमार पचिंद्रे, भारत लोकरे, सैद उलहक यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ‘बालगोपाल’च्या बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. उत्तरार्धात ६३ व्या मिनिटास ‘बालगोपाल’ने मैदानी गोलची नोंद करीत आपल्या संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. दोन गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या ‘शिवनेरी’ने सामन्यात बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समन्वय नसल्याने त्यांचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. उलट ‘बालगोपाल’कडून ८०, ८२ आणि ८५ व्यामिनिटास अशा तिन्हीवेळी रोहित कुरणे याने अनुक्रमे तीन गोलची नोंद करीत आपल्या संघास ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम राहिल्याने ‘बालगोपाल’ने ५-० असा सामना जिंकत स्पर्धेची पुढील फेरी गाठली. (प्रतिनिधी)