बळीराजाच्या संपास सांगलीकरांची साथ

By admin | Published: June 6, 2017 12:22 AM2017-06-06T00:22:05+5:302017-06-06T00:22:05+5:30

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद : शहरातील मुख्य बाजारपेठा, रस्ते ओस; दिवसभरात २५ कोटींची उलाढाल ठप्प

Baliarajya Samvas with Sangliikar | बळीराजाच्या संपास सांगलीकरांची साथ

बळीराजाच्या संपास सांगलीकरांची साथ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --सांगली : बळीराजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी सांगलीकरांनी शेतकऱ्यांच्या बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता. रस्ते ओस पडले होते. तसेच मार्केट यार्ड, फळ मार्केटमधील ८० टक्के व्यवहार ठप्प झाले होते. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सांगलीत २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहराच्या काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी काही प्रमाणात दुकाने उघडण्यात आली होती. पण शेतकरी संपाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय व सामाजिक संघटनांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करताच, समाजातील सर्व घटकांनी त्याला प्रतिसाद देत ‘शटर डाऊन’ केले.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपती पेठेत दिवसभर शुकशुकाट होता. अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. गणपती पेठेत दररोज १ कोटीची उलाढाल होते. सोमवारी केवळ २० लाखाचाही व्यवहार होऊ शकला नाही. पटेल चौकातील सिंधी मार्केटमध्येही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कापडपेठ व सराफ कट्टा सोमवारी बंद असल्याने तेथील रस्ते ओस पडले होते. मारुती चौक, हरभट रोड या परिसरातील व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वसंतदादा मार्केट यार्डातील हमाल संघटनेने बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. यार्डातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली खरी, पण ग्राहक, शेतकऱ्यांनीच त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने, दिवसभर व्यवहार बंद होते. कर्नाटकातील गूळ व इतर धान्याची आवकही बंद होती. तसेच आंध्र प्रदेशमधून चार ट्रक हळद घेऊन सांगलीच्या मार्केट यार्डात आले होते. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून केवळ या चार ट्रकमधील हळद हमालांनी उतरून दिली. त्यानंतर मात्र दिवसभरात मार्केट यार्डात शुकशुकाटच होता. मार्केट यार्डातील १२ कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.


सांगलीच्या मार्केट यार्डात ग्रामीण भागातून येणाऱ्या मालाची आवक पूर्णपणे बंद होती. हमालांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला होता. आवकच नसल्याने मार्केट यार्डातील व्यवहार ठप्प होते.
- विकास मगदूम, नेते, हमाल पंचायत, सांगली

गणपती पेठेतील व्यापार हा खेड्यापाड्यातील ग्राहकांशी, शेतकऱ्यांशी निगडित आहे. शेतकऱ्यांशी आपुलकीचे संबंध असल्याने बंदमध्ये गणपती पेठेतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला. वास्तविक संघटनेने बंदची घोषणा केली नसतानाही, केवळ शेतकऱ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधातून व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंदला पाठिंबा दिला.
- रमेश शहा, अध्यक्ष, गणपती पेठ व्यापारी असोसिएशन


इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात उत्स्फूर्त बंद
छोट्या व्यावसायिकांचाही सहभाग : भाजीपाला विक्री, दूध संकलन बंद


बेदाण्याची पंधरा कोटींची उलाढाल तासगावात ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या संपामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारपासून सलग तिसऱ्या सौद्याकडे सोमवारी पाठ फिरवली. त्यामुळे तब्बल १५ कोटींची उलाढाल ठप्प झाली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून बेदाणा सौद्याकडे पाठ फिरविली आहे. सोमवारी सलग तिसरा सौदा आवकेअभावी ठप्प राहिला. एका सौद्यासाठी सुमारे ५०० टन बेदाण्याची आवक होते, तर ३०० ते ३५० टन बेदाण्याची विक्री होते. सौदे ठप्प झाल्याने सुमारे १५ कोटींची उलाढाल थंडावली आहे.


मिरज तालुक्यात दूध संकलन ठप्प
आरगेत पुतळ्यांचे दहन : पूर्व गावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज पूर्व भागातील सर्वच गावांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. दूध संकलन व भाजीपाला वाहतूक ठप्प झाली. आरगेत गाव बंदबरोबरच संतप्त शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या प्रतिमांचे दहन केले.
मिरज पूर्व भागात यापूर्वी बंद ठेवण्यात आलेली मालगाव, म्हैसाळसह इतर गावे वगळता सर्वच गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आरगेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतिमांचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी दहन केले. सोनीत गाव बंदबरोबरच आठवडा बाजारही रद्द करण्यात आला होता. गोकुळसह खासगी दूध संस्थांकडून लाखो लिटर दूध संकलन केले जाते. बंदमुळे हे दूध संकलन होऊ शकले नाही.


सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा, निदर्शने
संपास पाठिंबा : शासकीय कार्यालयास आज टाळे ठोकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकरी संपास पाठिंबा देण्यात आला. कर्जमुक्तीचा निर्णय तातडीने न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.
स्टेशन चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. राजवाडा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करावा, वेअरहाऊस आणि शीतगृहांची साखळी तयार करावी, सिंचन योजनांचा निधी देऊन त्या तात्काळ पूर्ण कराव्यात, शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरावरील तहसील कार्यालयांना टाळे ठोक आंदोलन मंगळवारी केले जाणार आहे. या आंदोलनास सर्वांनी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय समितीने केले आहे.
मोर्चात जनता दलाचे अ‍ॅड. के. डी. शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशनचे युसूफ मेस्त्री, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, अवामि विकास पार्टीचे अशरफ वांकर, शहर जिल्हा काँग्रेसचे चिटणीस बिपीन कदम, मनसेचे अमर पडळकर, जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, श्रमिक महिला संघटनेच्या नलिनी सपाटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या डॉ. छाया जाधव, हिंद मजदूर सभेचे विकास मगदूम, फेरीवाले महासंघाचे अ‍ॅड. सुधीर गावडे, सतीश साखळकर आदी सहभागी झाले होते.


‘व्यापारी एकता’चा पाठिंबा
शेतकऱ्यांच्या बंद आंदोलनाला व्यापारी एकता असोसिएशन, मिरज व्यापारी असोसिएशन आणि बामणोली औद्योगिक वसाहत या तीन संघटनांनी पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या आंदोलनाबाबत सरकारने वेळीच लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा. जनतेची गैरसोय टाळावी. या आंदोलनाकडे सामान्य जनतेचे लक्ष आहे. आंदोलन जर लांबले तर व्यापारी बांधव आंदोलनात सक्रिय होतील. शेतकऱ्यांनीही अन्नधान्याची नासाडी न करता ते लोकांना वाटावे, अशी मागणी आहे.

Web Title: Baliarajya Samvas with Sangliikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.