Kolhapur: बालिंगा दरोड्यातील शूटरला इंदूरमध्ये ठोकल्या बेड्या, सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:09 PM2023-09-12T12:09:01+5:302023-09-12T12:09:36+5:30
दरोड्यानंतर पोलिसांनी स्थानिक तीन संशयितांना तातडीने अटक केली होती
कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्समध्ये आठ जूनला भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून सुमारे दोन कोटींचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील परप्रांतीय शार्पशूटरला पोलिसांनी अटक केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथे छापा टाकून संशयित अंकित ऊर्फ छोटू श्रीनिवास शर्मा (वय २३, रा. अम्बाह, जि. मुरैना, मध्य प्रदेश) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दरोड्यातील १५० ग्रॅम सोने, दोन पिस्तूल, सात काडतुसे, कार असा सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्यायनी ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी स्थानिक तीन संशयितांना तातडीने अटक केली होती. मात्र, त्या गुन्ह्यातील चार परप्रांतीय दरोडेखोर पसार होते. मध्यप्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेताना, त्यातील एक संशयित इंदूर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली.
त्यानुसार पथकाने एक सप्टेंबरला अंकित शर्मा याचा माग काढला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नातील शर्मा याला अटक केली. त्याने साथीदारांसह कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याच्याकडील पाच मोबाइल, डोंगल, सीमकार्ड, दरोडा घालताना अंगावर घातलेली कपडे हस्तगत केले. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार रामचंद्र कोळी, संजय हुंबे, संजय कुंभार, विलास किरोळकर, सागर चौगले, सुरेश पाटील, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
शर्मावर १५ गुन्हे
अटकेतील अंकित शर्मा हा तेराव्या वर्षांपासून गुन्हेगार आहे. त्याच्यावर मध्यप्रदेशातील तीन पोलिस ठाण्यांमध्ये १४ गुन्हे दाखल आहेत. मध्यप्रदेशातील अनेक टोळ्यांमध्ये शार्पशूटर म्हणून तो काम करीत होता.
अन्य आरोपींची नावे निष्पन्न
अंकित शर्मा याच्या चौकशीतून दरोड्यातील अन्य तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली. ते तिघेही मध्यप्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची माहिती मिळाली असून, लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळून दरोड्यातील मुद्देमाल जप्त केला जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंडित यांनी दिली.