बालिंगा सराफाने साडेतीन कोटींची फसवणूक केल्याचे सिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:22+5:302021-06-26T04:18:22+5:30
कोपार्डे - बालिंगा, ता. करवीर येथील अंबिका ज्वेलर्स मालक सराफ सतीश पोवाळकरने गुंतवणूकदारांची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले ...
कोपार्डे - बालिंगा, ता. करवीर येथील अंबिका ज्वेलर्स मालक सराफ सतीश पोवाळकरने गुंतवणूकदारांची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. सराफ सतीश पोवाळकर व दुसरा आरोपी त्याचा मेहुणा अमोल पोवार (रा. सातार्डे, ता. पन्हाळा) यालाही करवीर पोलिसांनी अटक केली आहे. सराफाला ८ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
मूळचा दोनवडे, ता. करवीर येथील सतीश पोवाळकर यांनी बालिंगा येथे अंबिका ज्वेलर्स नावाने सोन्याचांदीची पेढी सुरू केली होती सोन्या-चांदीचे दागिन्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असताना सराफ सतीश पोवाळकरने २०१३ पासून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर तारण कर्ज व सुवर्ण ठेव योजना भिशी सुरू केली होती. सुरुवातीला आकर्षक व्याज दिल्याने सराफ पोवाळकरकडे परिसरातील अनेक गावातील लोकांनी सुवर्ण ठेव योजना भिशीमध्ये लाखो रुपयांची ठेवली होती. याचबरोबर सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर तारण कर्ज घेतले होते.
पण एप्रिल महिन्यात सराफ पोवाळकर आपल्या पत्नीसह फरार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. गुंतवणूकदारांनी पोवाळकर विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. करवीर पोलिसांना पोवाळकरला शिताफीने १४ जूनला अटक केली होती. गेली महिनाभर पोलिसांनी सराफाने केलेल्या फसवणुकीचा तपास करून तक्रारदारांच्या तक्रारी व उपलब्ध कागदपत्राच्या आधारे ३ कोटी ५३ लाख ७ हजार ६६४ रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफ पोवाळकरला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.
चौकट १) सराफाची मालमत्ता जप्त -- पोलिसांनी सराफाच्या अंबिका ज्वेलर्समध्ये फक्त २ किलो चांदी व साडेचार ग्रँम सोने असा केवळ २ लाख १३ हजारांचा मुद्दे माल सापडला आहे. पण पोलिसांनी सराफाच्या घराची झडती घेऊन २१ विमा पॉलिसी, नागदेववाडीतील १० लाखांचा भूखंड, ६ बँक खाती ६ पतसंस्थातील खाती गोठवण्यात आली आहेत. तर चारचाकी गाडी व पाच मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे.
२)गहाण सोन्यावर गोल्ड लोन काढून फसवणूक - सराफ पोवाळकरने सोने गहाण ठेवून व्याजाने पैसे दिले होते. पण हेच ३९३ दागिने मालकांचे गहाण ४ किलो ४९३ ग्रॅम सोने मुथूट फायनान्स शाखा मिरजकर तिकटी व फेडरल बँकेत ठेवून परस्पर गोल्ड लोन काढून फसवणूक केली आहे. तर दोन साक्षीदारांचे २९.४ तोळे गहाण सोने परस्पर दुसऱ्याकडे परस्पर गहाण ठेवून १७ लाख ५ हजार रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे.
फोटो
आरोपी १) सतीश पोवाळकर (निळा शर्ट) २) अमोल पोवार (चौकटा शर्ट)