पाऊस वाढविणार बळिराजाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:37+5:302021-08-23T04:27:37+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाच्या उघडिपीचा कालावधी लांबण्याची चिन्हे दिसत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आठवडाभर पाऊस उघडीप घेणार आहे. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाच्या उघडिपीचा कालावधी लांबण्याची चिन्हे दिसत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आठवडाभर पाऊस उघडीप घेणार आहे. त्यामुळे बळिराजाला आता आभाळाकडे डोळे लावून बसावे लागणार आहे. रविवारी दिवसभर आभाळ एकदम उन्हाळ्यासारखे निरभ्र झाले. शनिवार दिवसभरातून एखाद दुसरी किरकोळ का असेना, पण सर येत होती, त्यामुळे पिकांना पण जीवदान मिळत होते.
रविवारी मात्र दिवसभर पावसाचा एक थेंबही पडला नाही. कडकडीत उन्हामुळे मात्र घामेघूम होण्याची वेळ आली. आता हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील शनिवारी (दि. २८) ला पाऊस येईल. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा पावसाची प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे दर्शन दुर्मीळ होणार आहे. सध्या महापुरातून वाचलेली पिके तरारली आहेत. सोयाबीन व भुईमूग शेंगा भरत असल्याने पावसाची गरज आहे. नवीन उसाच्या लावणीही सुरू आहेत. जमिनीतील ओलीवर लावण आटोपली जात आहे; पण पाऊस थांबल्याने त्याच्या उगवणीवर परिणाम होण्याची भीती आहे. नदीकाठावरील कृषीपंपाच्या वीज जोडण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. महापुरामुळे डीपी व खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे नद्यामध्ये पाणी असतानाही शेतकऱ्यांना पावसावरच विसंबून राहावे लागत आहे. पण, आता तर पावसात मोठा खंड पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.