जलसमाधीसाठी बळीराजाची नृसिंहवाडीकडे कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:56+5:302021-09-02T04:52:56+5:30
कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना तातडीने ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांकडे ...
कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना तातडीने ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथून बुधवारी पदयात्रेला सुरुवात झाली. पंचगंगा संगमावरील दत्त मंदिरात सकाळी आठ वाजता शेट्टी यांच्याहस्ते अभिषेक झाला. त्यानंतर स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी नृसिंहवाडीकडे पदयात्रेने कूच झाले.
पदयात्रा पाच दिवस पंचगंगा काठावरील पूरग्रस्त गावातून जाईल. यात्रेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी होण्याच्या तयारीने पाठीला बॅग अडकवून आले होते. महिला, तरुणांचा सहभागही लक्षवेधी राहिला. दत्त मंदिरातून पदयात्रा प्रयाग चिखलीत आल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा थांबून ग्रामस्थांनी स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेेले हे गाव असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आमच्यासाठी कोणीतरी लढत आहे, हे प्रकर्षाने दिसले. एका गावाहून दुसऱ्या गावात पदयात्रा जशी पोहोचत राहिली, तशी गर्दी वाढत राहिली. वाटेवरील सर्वच गावांनी पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले. आंबेवाडीतून पदयात्रा वडणगे येथे दीड वाजता पोहोचली. तेथील पार्वती मंदिरात ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली होती. तेथे जेवण करून दुपारी तीन वाजता पदयात्रा निगवे, भुयेमार्गे जात शिये येथे मुक्काम करण्यात आला.
पदयात्रेत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिदंर पाटील, सावकर मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जर्नादन पाटील, सागर शंभूशेठे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, अजित पोवार, सचिन शिंदे, राजगोंड पाटील, वैभव कांबळे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
चौकट
प्रमुख मागण्या अशा :
२०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमान पूल बांधावे, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा, महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे, त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, सामायिक खातेदार असणाऱ्या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसानभरपाई द्यावी.
चौकट
शेट्टींमुळेच उसाला दर
सर्वच राजकीय पक्षांनी आमचा वापर करून घेतला आहे. पक्षाचे नेते पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे
सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून यापुढे आम्ही शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्या पाठीशीच राहणार असल्याचे बाळासाहेब वरूटे, राजू पाटील यांच्यासह प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील काही वक्त्यांनी सांगितले. शेट्टी यांच्यामुळेच ७०० रुपये प्रतिटन उसाचा भाव तीन हजारांपर्यंत कारखानदारांना द्यावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
पदयात्रेचा आजचा
मार्ग असा
आज, गुरुवारी सकाळी आठ वाजता शिये येऊन पदयात्रेला प्रांरभ होईल. तेथून शिरोली, हालोंडी, हेर्लेमार्गे जाऊन चोकाक येथे पदयात्रेचा मुक्काम होईल.