बालगोपाल तालीम, ‘केएमसी’चा अष्टपैलू

By admin | Published: January 24, 2017 01:04 AM2017-01-24T01:04:05+5:302017-01-24T01:04:05+5:30

संपत मंडलिक

Balogopal Taleem, the all-rounder of KMC | बालगोपाल तालीम, ‘केएमसी’चा अष्टपैलू

बालगोपाल तालीम, ‘केएमसी’चा अष्टपैलू

Next

बॉल हेडवर घेऊन छातीवर घेणे व जोडीदारास ग्राऊंड पास देण्याची पद्धत नेत्रदीपक होती. त्याच्याकडे बॉल येताच विजेच्या चपळाईने तो बॉल ड्रिबल करीत आपल्या जोडीदारास तत्काळ पास देत असे. त्याचा धावण्याचा स्टॅमिनाही जबरदस्त होता. सरावात चुकार नसल्याने त्याला धावगती आणि स्टॅमिना आपसूकच प्राप्त झाला होता.
बालगोपाल तालीम व बाराईमाम दर्गा परिसर सन १९४० पासून आजतागायत फुटबॉलच्या वातावरणामुळे भारून गेलेला. यात बाराईमाम संघ पाठिंंब्याअभावी हळूहळू नामशेष झाला. बालगोपाल संघालाही मध्यंतरी मरगळ आली होती; पण या तालमीच्या संघाने नव्याने चांगलेच बाळसे धरले आहे. संपत शंकरराव मंडलिक हा बालगोपालच्या दुसऱ्या पिढीतील खेळाडू. बरीच मंडलिक कुटुंबे बालगोपाल तालमीच्या परिसरात राहत होती. त्यातीलच एक संपत मंडलिक होय. त्याचे मूळ घर मंगळवार पेठेत सुबराव गवळी तालमीलगत. सुप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू निशिकांत मंडलिक हा संपतचा मोठा भाऊ.
परिसरातील फुटबॉलमय वातावरणाचा परिणाम संपतवर झाला नसता तरच नवल. मोठ्यांचा खेळ पाहून बालपणीच तो फुटबॉल खेळाकडे ओढला गेला. समवयस्क मुलांमध्ये लहान रबरी चेंडूने खेळाचा सराव चालू झाला. ४ फूट ११ इंच मापाच्या सामन्यात संपतला बराच काळ स्पर्धा खेळण्याचा अनुभव प्राप्त झाला. त्याचा फायदा होऊन त्यास बालगोपाल तालीम मंडळाच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. वयाच्या १६ व्या वर्षांपासून २० व्या वर्षांपर्यंत त्याला या संघात प्रतिष्ठित स्थान मिळाले. या संघात त्याची प्रगती होण्यास हातभार लावणारे त्याचेच भाऊ कै. निशिकांत मंडलिक यांना तो गुरू मानतो. कोल्हापुरात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. मिरज, गडहिंग्लज या ठिकाणी संपत मंडलिकचा खेळ बहारदार झाला.
संपत मंडलिक दिसायला काळा सावळा, शरीराने अतिशय चपळ, लवचिक अन् काटकही. लहानपणापासूनच खेळाचा सराव असल्याने फुटबॉल खेळातील सर्व तंत्रांचे ज्ञान अवगत. लहानपणी सरावासाठी प्रायव्हेट हायस्कूलचे मैदान, नंतर शिवाजी स्टेडियम व गांधी मैदान. खेळामध्ये त्याचे राईट इन (फॉरवर्ड) हे स्थान पक्केहोते. बॉल ड्रिबल करीत प्रतिस्पर्ध्यास चकवा देत चित्त्याच्या चपळाईने गोलपोस्ट भेदून अनेक सामने त्याने जिंंकून दिले आहेत. त्याची लो-ड्राईव्ह किक व साईड व्हॉली अप्रतिम होती. बॉल हेडवर घेऊन छातीवर घेणे व जोडीदारास ग्राऊंड पास देण्याची पद्धत नेत्रदीपक होती. त्याच्याकडे बॉल येताच विजेच्या चपळाईने तो बॉल ड्रिबल करीत आपल्या जोडीदारास तत्काळ पास देत असे. त्याचा धावण्याचा स्टॅमिनाही जबरदस्त होता. सरावात चुकार नसल्याने त्यास धावगती आणि स्टॅमिना आपसूकच प्राप्त झाला होता. बालगोपालचे जुने खेळाडू कै. दत्ता विचारे, कै. प्रभाकर मगदूम, कै. दिनकर मगदूम, कै. नारायण शिंदे यांचे नाव जसे आजही आदराने घेतले जाते. त्याच पंक्तितील संपत होय. प्रत्येक सामन्यात मैदान गाजविणारा हा खेळाडू बालगोपालचा ‘मेरुमणी’ होय.
संपत मंडलिकसारखा उत्तम ‘राईट इन’ आपल्या संघास लाभावा, असे प्रत्येकास वाटू लागले. उत्कृष्ट फुटबॉल खेळामुळे संपतच्या जीवनात एक सुसंधी आली. त्याचवेळी कोल्हापूर महानगरपालिकेत उपायुक्त सुर्वे व के.एम.टी.कडे शिवाजीराव पाटील ट्रान्सपोर्ट मॅनेजर, असे दोघे अधिकारी फुटबॉलपे्रमी होते. त्यांच्या लक्षात आले की, कोल्हापूर हे कुस्तीनंतर फुटबॉल या खेळास प्राधान्य देते. सर्वांनुमते या दोघा अधिकाऱ्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचा फुटबॉल संघ तयार करून त्यात निवडक खेळाडू सामील करून घेतले व त्यांना महापालिकेत कायमची नोकरी दिली. संपत मंडलिक त्यातीलच एक निवडक खेळाडू. या नोकरीमुळे त्याचे कायमचे कल्याण झाले. अल्पशिक्षित असूनही केवळ फुटबॉलमुळे मिळालेल्या नोकरीने आयुष्यात स्थिरता आली.
त्या काळात राष्ट्रीयस्तरावर परिवहन विभागाचे सामने (महापालिका) होत असत. कोल्हापूरचा के.एम.टी.संघ या स्पर्धांमध्ये अव्वल असे. संपतला सांगली, पुणे, बेळगाव येथेही खेळण्याची संधी लाभली. तो बराच काळ ‘सेंटर हाफ’लाही खेळत असे.
महापालिका संघातून भावनगर, कलकत्ता, चेन्नई, मद्रास, हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली, बडोदा, बीड, परभणी, अकोला, मुंबई इत्यादी भारतातील विविध ठिकाणी संपत मंडलिक यास आपल्या चिरस्मरणीय खेळाचे प्रदर्शन करता आले. संपत सुमारे २५ वर्षे फुटबॉल खेळला.
कोल्हापुरात फुटबॉलमध्ये खूप टॅलेंट आहे. ते ओळखणारे सुर्वे व शिवाजीराव यांच्यासारख्या इच्छाशक्ती व रत्नपारखी असणाऱ्या वरिष्ठ लोकांची गरज आहे. बालगोपाल तालीम परिसरात खेळणारा संपत मंडलिक सारा भारत गाजवून आला. याचा बालगोपाल तालीम व कोल्हापुरातील सर्व रसिक प्रेक्षकांना अभिमान आहे.
(उद्याच्या अंकात : रघुनाथ पाटील)

Web Title: Balogopal Taleem, the all-rounder of KMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.