‘बलराम’ची लढत ‘बळा’वरच
By admin | Published: October 24, 2015 01:01 AM2015-10-24T01:01:18+5:302015-10-24T01:07:13+5:30
धक्कादायक निकालाची अपेक्षा : सूर्यवंशी आपला गड राखणार काय?
कोल्हापूर : महापालिकेच्या सर्वच प्रभागांत साम, दाम, दंड या नीतीचा वापर सर्रास सुरू आहेच; पण खऱ्या अर्थाने मतदारांबरोबर उमेदवारांचे ‘बळ’ अजमावणारी लढत प्रभाग बलराम कॉलनीमध्ये पाहावयास मिळते. कॉँग्रेसचे नंदकुमार सूर्यवंशी, भाजप-ताराराणीचे गणेश खाडे व अपक्ष राहुल माने यांच्यात निकराची झुंज सुरू असून, येथे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण तोंडवळा असलेल्या बलराम कॉलनी प्रभागात समिश्र स्वरूपाचे मतदान आहे. कॉँग्रेसकडून नंदकुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी दिल्याने राहुल माने यांनी अपक्ष म्हणून रिंंगणात उडी घेतली. गतनिवडणुकीत शिवसेनेकडून सूर्यवंशी यांना कडवी झुंज दिलेले गणेश खाडे यांनी यावेळी मात्र ‘कमळ’ हातात घेतले आहे. पाच वर्षांतील कामाच्या बळावर सूर्यवंशी मतदारांपुढे गेले आहेत. सुतारमळा, त्रिमूर्ती कॉलनीसह सुशिक्षित भागात नंदकुमार सूर्यवंशी यांची पारडे थोडे जड दिसते. जोशी गल्ली, सायरत गल्ली, मीराबाग व लक्षतीर्थला लागून असलेला भागात गणेश खाडे यांचे प्राबल्य दिसते. इंगवले कॉलनी, धनगरवाडा, कसबेकर पार्क, आदी भागात राहुल माने यांनी बऱ्यापैकी हवा तयार केली आहे. शिवसेनेचे संजय चव्हाण व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तुषार लोहार यांनीही संपर्कावर भर देत प्रभाग पिंंजून काढला आहे. पंचरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत सूर्यवंशी, खाडे व माने यांच्यातच पाहावयास मिळते. राहुल माने यांनी तरुण मंडळे व युवा मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे; तर सूर्यवंशी यांनी विकासकामांच्या माध्यमातून थेट मतदारांशी संपर्क ठेवला आहे. सत्ता नसतानाही २७ लाखांची विकासकामे केल्याचा दावा करीत गणेश खाडे यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. युवा चेहरा व गतनिवडणुकीत थोड्या मतांनी पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्याविषयी काही भागांत सहानुभूती दिसते. एकंदरीत, नंदकुमार सूर्यवंशी यांना विकासकामांची शिदोरी, गणेश खाडे यांना सहानुभूती की राहुल माने यांना विश्वासाचे ‘बळ’ तारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.