HSC Result2024: हॉटेल कामगार तरी बारावी परीक्षेत यश दमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:49 AM2024-05-22T11:49:45+5:302024-05-22T11:51:34+5:30

कोल्हापूर : बारावी कला शाखेच्या बाळू भागोजी आडूळकर, सुरज भागोजी म्हेतर आणि अविनाश निवास मोरेकर या विद्यार्थ्यांनी हॉटेलमध्ये काम ...

Balu Bhagoji Adulkar, Suraj Bhagoji Mhetar and Avinash Niwas Morekar succeeded in the 12th examination by working in a hotel | HSC Result2024: हॉटेल कामगार तरी बारावी परीक्षेत यश दमदार

HSC Result2024: हॉटेल कामगार तरी बारावी परीक्षेत यश दमदार

कोल्हापूर : बारावी कला शाखेच्या बाळू भागोजी आडूळकर, सुरज भागोजी म्हेतर आणि अविनाश निवास मोरेकर या विद्यार्थ्यांनी हॉटेलमध्ये काम करुन घवघवीत यश संपादित केले आहे. हे सर्व विद्यार्थी न्यू कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांचे संस्थेच्या संचालकांनी आणि कॉलेजच्या प्राचार्यांनी विशेष कौतुक केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. न्यू कॉलेजमध्ये कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या बाळू भागोजी आडूळकर या विद्यार्थ्याने ६८.१७ टक्के गुण मिळविले आहेत. त्याने हॉटेलमध्ये काम करून बारावीची परीक्षा दिली होती. बाळू आडूळकर हा सांगरुळजवळील मठाचा धनगरवाडा येथील रहिवासी आहे. त्याचे आईवडील गावात शेती करतात.

परिस्थितीमुळे तो कोल्हापुरातील एका उडपी हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घेत होता. बाळूचे या गावात छोटेसे घर आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्याचे आठवीपर्यंत शिक्षण गावीच झाले. कोल्हापुरात शाहू दयानंद वसतिगृहात राहून दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने घेतले. याकाळात त्याने आधी एका हॉटेलमध्ये काम मिळवलं. नंतर ‘न्यू कॉलेज’मध्ये अकरावीत प्रवेश घेतला. अकरावीतही त्याला चांगले गुण मिळाले. पण बारावीच्या परीक्षेचं खूप टेन्शन होतं, असं बाळू सांगतो. दिवसा हॉटेलमध्ये काम करून उरलेल्या वेळेत न्यू कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि परीक्षेत मोठं यश संपादन केलं आहे. त्याला शिक्षक आणि सहाध्यायी विद्यार्थ्यांचे खूपच सहकार्य लाभले.

सूरजची धडपड आणि यशाने डोळ्यात आले पाणी...

पन्हाळा तालुक्यातील घुटणी येथील सूरज भागोजी म्हेतर यानेही कला शाखेत ५४.८३ टक्के गुण मिळवून या परीक्षेत चांगले यश मिळविले. सूरजची घरची परिस्थितीही खूपच बेताची आहे. घरच्या उदरनिर्वाहासाठी त्याने रंकाळा टॉवर येथील एका हॉटेलमध्ये काम करुन घरही सांभाळले आणि अभ्यासही केला. त्याला आपल्या सवंगड्यांचीही खूप मदत झाली. जेव्हा दुपारी निकाल लागला, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. भविष्यात चांगले शिक्षण घेण्याची मनिषाही त्याने बोलून दाखविली.

रात्री जागून अविनाशने केला अभ्यास

भुदरगड तालुक्यातील शिवडावजवळील गावठाण भागात राहणाऱ्या अविनाश मोरेकर यानेही कोल्हापुरात अंबाबाई मंदिराजवळील एका हॉटेलमध्ये दिवसा काम करुन न्यू कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने गावीच घेतले. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये त्याने नोकरी धरली. गावी पैसे पाठवून उरलेल्या पैशातून शिक्षण घेतले. घरी आई, वडील आणि मोठी बहीण आहे. सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत तो या हॉटेलमध्ये काम करतो. बारावीला रात्री अभ्यास करुन त्याने जेमतेम ४७ टक्के गुण मिळवले. आता त्याला अजून पुढचे शिक्षण घ्यायचे आहे.

Web Title: Balu Bhagoji Adulkar, Suraj Bhagoji Mhetar and Avinash Niwas Morekar succeeded in the 12th examination by working in a hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.