बाळूमामाच्या खजिन्यावर डल्ला: रुग्णालयाची चार कोटींची यंत्रणा धूळ खात, मात्र भाविकांना चांगला उपयोग
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 3, 2023 12:13 PM2023-11-03T12:13:42+5:302023-11-03T12:15:09+5:30
इंदुमती गणेश कोल्हापूर : बाळूमामांच्या दर्शनासाठी परगावाहून आलेले भाविक व पंचक्रोशीतील रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार व्हावेत यासाठी देवालयाच्यावतीने सुरू ...
इंदुमती गणेश
कोल्हापूर : बाळूमामांच्या दर्शनासाठी परगावाहून आलेले भाविक व पंचक्रोशीतील रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार व्हावेत यासाठी देवालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेले बाळूमामा रुग्णालय तत्कालीन विश्वस्त व पूर्वीच्या रुग्णालय व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे गेल्या चार वर्षांपासून बंद आहे.
शस्त्रक्रिया, तपासण्या, एक्सरे, सोनाग्राफीची अत्याधुनिक मशीनरी अशी ४ कोटींहून अधिक रकमेची वैद्यकीय यंत्रणा अक्षरश: धूळखात पडली आहे. काही मशीनरी गायब झाली आहे. बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे पण एक रुपया ट्रस्टकडे जमा होत नाही. सर्वात गंभीर म्हणजे येथील महिला कर्मचाऱ्यांनी सध्याच्या खासगी व्यवस्थापनाक़डून गैरवर्तणूक केली जात असल्याची तक्रार धर्मादाय उपायुक्तांकडे केली आहे, याला दोन महिने झाले तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही.
बाळूमामांचा भक्तवर्ग चार राज्यांत आहे. रविवार, प्रत्येक अमावस्या तसेच वर्षभरातील यात्रा उत्सव असे ८० लाखांवर भाविक बाळूमामांच्या दर्शनाला येतात. त्यांच्यासह पंचक्रोशीतील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील गरीब कुटुंबांतील रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार व्हावे यासाठी २०१५ साली सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे रुग्णालय सुरू करण्यात आले. याचा सुरुवातीला तीन वर्षे हजारो रुग्णांना चांगला लाभ मिळाला. रुग्णालय चांगले सुरू असताना २०१९ साली तत्कालीन विश्वस्त व रुग्णालय व्यवस्थापनातील अंतर्गत गटबाजीतून बंद केले गेले. रुग्णालयाचे दोन मजले कुलूपबंद असून कोट्यवधींची मशीनरी वापराविना पडून आहे, तर काही गायब झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, म्हणून सध्या नावाला बाह्य रुग्ण विभाग खासगी व्यवस्थापनाकडून चालवला जातो. पण त्यांचे प्रमुख दवाखान्यात येत नाहीत, सोयीसुविधा देत नाहीत. आले तर सर्वांना अपमानास्पद वागणूक व त्रास देतात अशा तक्रारी आहेत.
अशा होत्या आरोग्य सेवा
५० बेडच्या या रुग्णालयात सोनोग्राफी, इको, एक्सरेच्या अत्याधुनिक मशीनरी होत्या. तपासण्यांसाठी स्वतंत्र लॅब, रक्तपेढी होती. नेत्र, दंत, मेंदूविकार, आर्थोपेडीक, गायनॅक, अशा महिन्याला १५० शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार होत होते.
महिलांशी लज्जास्पद वर्तन
खासगी व्यवस्थापनाच्या प्रमुखांकडून महिला डॉक्टर, कर्मचारी व महिला रुग्णांसोबतच्या गैरवर्तणुकीची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. रुग्णांची तपासणी करताना लगट करणे, लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व वागणे, तासनतास आपल्या केबीनमध्ये बसवून ठेवणे, महिला रुग्णांचे मोबाइल नंबर घेऊन चॅटिंग करणे अशा गंभीर तक्रारी लेखी स्वरूपात धर्मादाय सहआयुक्तांना व प्रशासकांना दिले आहे. यासह सर्व कर्मचाऱ्यांनी खासगी व्यवस्थापन बंद करून देवालयानेच दवाखाना चालवावा अशी मागणी केली आहे.
धर्मादायचा शेरा
रुग्णालयातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आयपीएफ खाते उघडण्यात आलेले नाही, कायद्याचे उल्लंघन करत सुरुवातीला १० वर्षांचा करार केला गेला. पूर्वी रुग्णालयाचे उत्पन्न देवालय ट्रस्टकडे जमा केले जात असे, गेल्या वर्षात एक रुपयाही मिळालेला नाही.
रुग्णालयाचे तीन वर्षाचे उत्पन्न
- २०१७-१८ : १ कोटी २१ लाख ९१ हजार ६५३
- २०१८-१९ : १ कोटी ४५ लाख ६५ हजार १८४
- २०१९-२० : १ कोटी ५१ लाख ३९ हजार ३३२