आदमापुरात बाळूमामांचा पालखी सोहळा उत्साहात; भंडाऱ्याची उधळण, अश्व नृत्य अन् भाविकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 01:23 PM2023-03-21T13:23:41+5:302023-03-21T13:54:15+5:30
‘बाळूमामांच्या नावानं चांगभलंऽऽऽ’च्या गजरात, ढोल-कैताळांच्या निनादात भंडाऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीने आदमापूर गाव न्हाऊन निघाले
बाजीराव जठार
वाघापूर : महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेत आज पालखी सोहळा उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलंऽऽऽ’च्या गजरात, ढोल-कैताळांच्या निनादात भंडाऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीने आदमापूर गाव न्हाऊन निघाले.
सकाळी बाळूमामांच्या मंदिरातून निघालेल्या या पालखी सोहळ्यात अध्यक्ष धैर्यशील भोसले, विठ्ठल पुजारी, मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मरगूबाई मंदिर येथे आली. तेथून ती पुन्हा गावातील अनेक गल्लीतून मार्गस्थ झाली. पालखी सोहळ्यात बाळूमामांच्या बग्गींतील अश्वांच्या नृत्यांनी आकर्षण ठरले होते.
या पालखी सोहळ्यातील सहभागी भक्तांना गावातील सुयोग अगरबत्तीचे महादेव पाटील, बाळूमामा फाउंडेशन, बजरंग दूध संस्था, दिनकरराव भोसले गुरुजी वाचनालय यांनी शाकाहारी बिर्याणीचे, तर युवा स्पोर्टस्तर्फे बिर्याणी व रबडी वाटप, तसेच विविध तरुण मंडळांनी सरबत, अन्नछत्र आदींचे आयोजन केले होते. सायंकाळी गावाच्या आड विहिरीत भंडारा टाकून पुन्हा बाळूमामांच्या मंदिरात पालखी सोहळा दाखल होऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या पालखी सोहळ्याचे नियोजन बाळूमामा देवालय समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.
गेली सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तिमय वातावरणात भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत ढोल-कैताळांच्या गगनभेदी आवाजात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाळूमामांच्या नावानं चांगभलं, जय जय बाळूमामा अशा जयघोषात श्रीक्षेत्र आदमापूर नगरी भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत भंडारमय झाली. उत्सवाच्या काळात कीर्तनकार, प्रवचनकार यांची कीर्तने, प्रवचने, भजनी मंडळांची भजने, धनगरी ढोलवादन, तसेच सुमारे १८ टन तांदूळ, गहू धान्यांचा भात व खिरीच्या महाप्रसादाचा लाभ सुमारे दोन लाख भाविक-भक्तांनी घेतला.
या पालखी सोहळ्याचे नियोजन बाळूमामा देवस्थान समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते. देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, भुदरगड पोलिस निरीक्षक, तहसीलदार वरुटे, प्रांत अधिकारी वसुंधरा बारवे, मंडल अधिकारी राहुल शिंदे, पोलिस यंत्रणा, व्हाईट आर्मीचे जवान, मराठा कमांडो व त्यांचे ३५ सहकारी, आदमापूर गावासह आसपासच्या गावांतील सेवेकरी तरुण, महिलावर्ग यात्रेसाठी दक्ष होते.