बांबूची डोली हीच ‘१०८ आरोग्य सेवा’, शाहूवाडीतील आंबाईवाड्याची अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:53 AM2018-04-10T00:53:39+5:302018-04-10T00:53:39+5:30
आर. एस. लाड ।
आंबा : अभयारण्यातील हिंस्र प्राण्यांची टांगती तलवार, डोंगर-झाडीतील पायवाट, खांद्यावरील डोलीत निपचित पडलेला रुग्ण नि जीव मुठीत धरून दहा किलोमीटरवरील दवाखान्याकडे धावणारे ग्रामस्थ हे विदारक चित्र आहे आंबाई व उखळू धनगरवाड्यावरचे. शाहूवाडीच्या उत्तर सीमेवरील चांदोली अभयारण्याशी बिलगून असलेला उखळूचा आंबाईवाडा स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही रस्ता व आरोग्य या सुविधेअभावी वनवास भोगत आहे.
अभयारण्याच्या सीमेवरून या वाड्यावर दहा किलोमीटर झाडीतून थेट चढणीने सह्याद्रीच्या माथ्यावर नागमोडी पाऊलवाट पोहोचते. आंबाईच्या पुढे खोतवाडा, पाचणे वस्ती, हेळ््याचा माळ व वरचा धनगरवाडा या चार वस्त्यांतील सव्वाशे उंबरा एक किलोमीटरवरील कड्यालगत वसला आहे. धनगर व कुणबी समाज तीन पिढ्यांपासून येथे राहतो. रस्ता नाही म्हणून अन्य सुविधांची येथे वानवा आहे. वीज दोन वर्षांपूर्वी पोहोचली. रस्ता हे येथील दिवास्वप्नच आहे. येथे रुग्ण किंवा बाळंतीण मातेच्या पाचवीलाच सुविधेची वानवा पुजलेली आहे. चिव्याने विणलेल्या डोलीत घोंगडे पसरून रुग्णाला बसविले जाते. डोलीत दोन्ही बाजूला बांबू घालून चौघेजण डोली खांद्यावर घेऊन रुग्णाला सीमेवरील आरळा-चरणात धाव घेतात. गेल्या तीन पिढ्यांतील वास्तवचित्र बदलणार केव्हा? असा प्रश्न येथील उपसरपंच दीपक गावडे व नथुराम खोत यांनी केला.
सर्वत्र १०८ च्या सुविधेचा बोलबाला असताना या वस्तीवरील डोली खांद्यावर घेऊन धावणारे ग्रामस्थ सुविधांचा सूर्य उगवण्याची वाट पाहत आहेत. येथील घनघोर पावसाळा तर या वनवासी मंडळींची झोप उडवतो. घसरगुंडी करीतच पाठीवर रुग्ण घेऊन धोकादायक पायपीट नशिबी असल्याची व्यथा शामराव बकरे व ठकाबाई गावडे
यांनी मांडली. कोल्हापूर, सांगलीव सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरीलहा अभयारण्याचा भाग सह्याद्रीव्याघ्र प्रकल्प म्हणून विकसितहोत आहे. यामुळे त्यांच्या उपजीविकेच्या साधनावर निर्बंध आले आहेत.
जीवघेणा प्रसंग
पाजणे वस्तीतील बयाबाई पाजणे यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना डोलीत घालून आणताना चार किलोमीटरचे जंगल उतरून येताच वाटेतच प्रसूती झाल्याचा जीवघेणा प्रसंग येथील सुईन सोनाबाई विठू झोरे यांच्या मनावर कोरल्याची आठवण त्यांनी सांगितली. अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जाऊन अनुभव घेणारा, तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वस्ती करून राहिलेला धनगर समाज नवा नाही. रस्त्यांअभावी पावसाळ्यात निळेपैकी पिंगळेवाडा, पुसार्ळे धनगरवाडा, राघूचा वाडा, विशाळगड येथे रुग्णांना डोलीत बसवून दवाखान्यात नेणारी व्यवस्था स्थानिकांनी उभारली आहे.