बांबवडेच्या पाझर तलावात मगर पिलासह आढळली मगर : ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण
By admin | Published: May 14, 2014 12:38 AM2014-05-14T00:38:51+5:302014-05-14T00:39:02+5:30
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील पाझर तलावात पिलासह मगरीचा वावर आढळून आल्याने बांबवडे व परिसरातील गावांमधील लोकांच्यात
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील पाझर तलावात पिलासह मगरीचा वावर आढळून आल्याने बांबवडे व परिसरातील गावांमधील लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. बांबवडेच्या पश्चिमेस असलेल्या पाझर तलावामध्ये या मगरीचा वावर असल्याचे आढळून आले. या तलावामध्ये बांबवडे, डोणोली, गोगवे, आदी गावांतील लोक पोहण्यासाठी जातात. कपडे धुण्यासाठीही महिलांची दिवसभर वर्दळ असते. तसेच वयोवृद्धही मॉर्निंग वॉकसाठी याच परिसरात जातात. यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तलाव परिसरात वर्दळ असते. सकाळी अंघोळीसाठी गेलेल्या युवकांना साधारणपणे ८ ते ९ फूट लांबीची मगर पिलासह तलावाच्या काठावर दिसून आली. मगरीचा वावर या तलाव परिसरात असल्याने सुटीचा आनंद पोहण्यातून उपभोगणार्या मुलांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तसेच तलावाच्या दक्षिण व उत्तर बाजूस घरांचीही संख्या वाढलेली आहे. यामुळे येथे राहणार्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या तलावाचा उपयोग बांबवडेसह इतर गावांनाही होत असल्याने व तलावाशेजारी लोकवस्ती वाढू लागल्यामुळे या मगरीचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)