चीनच्या कृत्रिम फुलांवर बंदी घाला, राजू शेट्टींची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:28 PM2022-08-24T15:28:29+5:302022-08-24T15:29:08+5:30
चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
जयसिंगपूर : चिनी बनावटीच्या प्लास्टिक कृत्रिम फुलांमुळे देशातील फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशातील फूलशेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चिनी कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली.
गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे लॉकडाऊन व चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण व समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू, ॲस्टर, शेवंती, गॅलार्डिया, आदींसह विविध फुलांना मोठी मागणी असते. मात्र, ही फुले चीनमधून प्लास्टिक स्वरूपात कृत्रिम म्हणून आयात झालेली आहेत व भारतीय बाजारपेठेत त्यांचा वापर विविध समारंभात केला जात आहे. याचा सर्वाधिक फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात फुलांचे दर गडगडले आहेत.
यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी तातडीने पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव नरेश पाल गंगवार व सहसचिव सत्येंद्रकुमार यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सुतोवाच केले असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.