जिल्ह्यासह शहर, तालुक्यातही प्रवेशबंदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:52+5:302021-04-23T04:26:52+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व तालुकाबंदीही करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस गस्त व कारवाईच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोना संक्रमणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे, त्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊन पुकारला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेला वगळले असले तरीही नागरिकांना जिल्हा प्रवेशबंदी व फिरण्यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांना तालुक्याबाहेरही फिरता येणार नाही. तालुकास्तरावरही पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूर व इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष ठेवून तेथील नागरिकांनाही एक किलोमीटर अंतराबाहेर वस्तू खरेदीसाठी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले.
तालुका प्रवेशाला बंदी
जिल्ह्यातील एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यावर प्रतिबंध राहणार आहे. त्यासाठी तालुका तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यावर ग्रामीण व्यक्तीला येण्यासही प्रतिबंध केला आहे. त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
एक कि.मी. अंतराबाहेर आढळल्यास कारवाई
नागरिकांना अत्यावश्यक सुविधा या एक कि.मी. अंतरापर्यंत उपलब्ध आहेत. त्याच्या कारणास्तव एखादी व्यक्ती एक कि.मी. अंतराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्या रहिवासी ठिकाणाची शहानिशा करून त्याच्यावर वाहन जप्ती, दंड, गुन्हे दाखल व जागीच ॲन्टिजेन चाचणीची कारवाई करण्यात येणार आहे.
आता ‘इव्हिनिंग वॉक’वरही कारवाई
पोलीस खात्यामार्फत रोज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांवर कारवाई सुरू आहे. पण आता ‘इव्हिनिंग वॉक’साठी घराबाहेर पडलेल्या सर्वांवरच कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी जेवणानंतर घराबाहेर ग्रुपने एकत्र बसणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सायंकाळी अगर रात्री उशिराही बाहेर फिरू नये, असे आवाहन पोलीस खात्यामार्फत केले.
आंतरजिल्हा नाकाबंदीची ठिकाणे
कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदीच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका, कोगनोळी टोल नाका तसेच सांगली रोडवरील अंकली पूल, आंबा (ता. शाहूवाडी), शिनोळी (ता. चंदगड), राधानगरी, गवसे (आजरा) या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी असतील. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्ताची विभागणी केली आहे.
कोल्हापूर, इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष
कोल्हापूर शहरात नऊ, तर इचलकरंजी शहरात सहा ठिकाणी कायम पोलिसांची नाकाबंदी राहणार आहे. त्याशिवाय बाजारपेठा, भाजी मार्केटच्या बाहेर पोलिसांची तपासणी पथके ठेवण्यात येत आहेत. येथे वस्तू खरेदीसाठी येणारा एक कि.मी. अंतरापेक्षा जादा दूरवरून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
भरारी पथकांत वाढ
कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याने कारवाईसाठी पोलिसांच्या फिरत्या भरारी पथकांची संख्या वाढवली आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे मोबाईल व्हॅनही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक भरारी पथकासोबत महानगरपालिकेचा कर्मचारीही असेल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे.
शेतीकामासाठी व मालवाहतूक परवाना
शेतीकामासाठी नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. त्यासाठी शेतीकामाचे कारण बंदोबस्तावरील पोलिसांना पटवून दिले पाहिजे. त्याशिवाय मालवाहतुकीला परवानगी आहे.
अत्यावश्यक कारणांसाठीच परवाना...
घरात अगर नात्यात कोणी मृतक अथवा मृतक विधीसाठी जाणार असेल तर, रुग्णालयात पेशंटला नेण्यासाठी अगर अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेर फिरण्यास परवानगी दिलेली आहे.