Kolhapur: माणगावमध्ये डॉल्बी, फटाके, डिजीटल फलक लावण्यास बंदी, विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:49 PM2024-05-22T16:49:49+5:302024-05-22T16:50:10+5:30
नियमावलीचे उल्लघंन केल्यास दंड
अभय व्हनवाडे
रूकडी/माणगाव: माणगाव ता.हातकणगंले येथे रविवार (दि.१२ मे) रोजी मोबाइलवरील स्टेटसवरुन दोन समाजात झालेल्या तणाव निर्माण झाला होता. यानंतर गावात सामाजिक सलोखा टिकावा यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवून गावामध्ये डॉल्बी, चौकात डिजिटल फलक लावणे, सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस निमित्त फटाके वाजविणे यावर बंदी घातली आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली.
माणगावमध्ये विविध धार्मिय महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. जयंती दिनी युवक दुचाकी वाहनांच्या पुंगळ्या काढून गावभर फिरतात. यावरुन प्रसंगी वादावादीचे प्रसंग घडतात. यामुळे सामाजिक व धार्मिक तणाव वाढत आहे. सामाजिक सलोखा टिकावा याकरिता ग्रामपंचायतीने आचारसंहिता बनविली आहे, ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत सर्वधर्मिय शांतता कमिटी स्थापन करणे. गावामध्ये धार्मिक-सामाजिक-राजकीय कार्यक्रम सह वाढदिवसानिमित्त डिजीटल फलक न लावणे, डॉल्बी न लावणे, पुंगळया काढून वाहन पळविणेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबरोबर गावातील मार्गावर वाढदिवस साजरा करणे. रात्रीचे फटाके वाजविणे, रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर खेळ खेळण्यास ही प्रतिबंध करण्यात आला आहे.
नियमावलीचे उल्लघंन केल्यास दंड
नियमावलीचे उल्लघंन केल्यास संबंधितांचे खासगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद व घरफाळामध्ये पाच हजार रुपयांचा दंड आकारुन वसूल करण्याचा ठराव सभेने संमत केला आहे. तसेच जातीय तणाव होईल असे स्टेटस लावणे असे मजकूर सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय ही ग्रामसभेने मान्य केला.
ग्राामसभेत अनिल जगदाळे, नंदकुमार शिंगे यांनी हा ठराव मांडला त्यास अनिल पाटील, दादासो वडर यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेचे ठरावाचे प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय इचलकरंजी, तहसिलदार ऑफिस व पोलिस स्टेशन हातकणंगले यांना देण्यात आली.
गावांमध्ये स्टेटसवरून निर्माण झालेला जातीय तेढ अशोभनीय असून सामाजिक शांतता व सलोखा टिकावे याकरिता ग्रामसभेत झालेल्या निर्णयाचे कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. - डॉ.राजू मगदूम, सरपंच माणगाव