उसाचा रस, बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी शिथिल; केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:33 PM2024-09-14T12:33:42+5:302024-09-14T12:34:06+5:30
साखर कारखान्यांना दिलासा
कोल्हापूर: उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिस पासून अल्कोहोल निर्मिती वरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने शुक्रवारी उठवली. साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे.
देशात साखरेचा पुरवठा कमी पडू नये यासाठी दक्षता म्हणून १५ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे उसाचा रस आणि बी हेवी मोलासिस पासून रेक्टिफाईड स्पिरिट ,इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल निर्मितीवर बंदी घातली होती. यातील इथेनॉल निर्मिती वरील बंदी काही दिवसापूर्वीच उठविली. अल्कोहोल आणि रेक्टिफाइड स्पिरिटवरील बंदीही उठवावी, अशी साखर उद्योगाची मागणी होती.
आगामी हंगामात साखरेचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. तसेच हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक साखरेचा साठाही पुरेसा असणार आहे. या पार्श्वभूमीवर आधी इथेनॉल आणि आता अल्कोहोल निर्मितीवरील बंदीही उठविल्याने आगामी हंगाम साखर कारखानदारीसाठी चांगला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साखरेचा विक्री दर वाढवावा
साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तो वाढवून ४२००रुपये करावा अशी मागणी साखर कारखानदारांकडून गेल्या दोन-तीन वर्षापासून होत आहे. केंद्र सरकारने ही मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही. साखरेचा विक्री दर वाढल्यास साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे तयार होणारे अल्कोहोल हे केमिकल उत्पादने, देशी दारूचे उत्पादन तसेच फॉरेन लिकर साठी उपयोगी असल्याने त्यासाठीची बाजारपेठ कारखान्यांना उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यास मदत होणार असल्याने केंद्राचा हा निर्णय दिलासादायक आहे. -पी.जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक