कोल्हापूर 'उत्तर'च्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 10:40 AM2022-04-16T10:40:08+5:302022-04-16T10:40:38+5:30

निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर व मतमोजणी केंद्राबाहेर फटाके, गुलाल उधळण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Ban on victory procession after Kolhapur North verdict, tight security by police in kolhapur | कोल्हापूर 'उत्तर'च्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोल्हापूर 'उत्तर'च्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Next

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी आज, शनिवारी राजाराम तलाव परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत होत आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर व मतमोजणी केंद्राबाहेर फटाके, गुलाल उधळण्यासही मनाई करण्यात आली आहे. याबाबत उमेदवारांना सूचना देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. काही मार्ग एकेरी केले आहेत. उमेदवारांच्या समर्थकांना थांबण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. निकालानंतर उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जयश्री जाधव यांनी आघाडी घेताच पालकमंत्री सतेज पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा बावडा मतदारसंघात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पोलिसांची नजर राहणार आहे.

बंदोबस्त असा

पोलीस उपअधीक्षक : २
पोलीस निरीक्षक : ६
पोलीस उपनिरीक्षक : १०
पोलीस कर्मचारी : १३०
होमगार्ड : १००
आरसीपी : १ तुकडी
सीआयएसएफ : २ तुकडी
एसआरपीएफ : १ तुकडी

Web Title: Ban on victory procession after Kolhapur North verdict, tight security by police in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.