अंबाबाईच्या मंदिरात व्हीआयपी व पेड पासवर बंदीच, दिवाणी न्यायालयाचे आदेश
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 26, 2022 08:55 PM2022-09-26T20:55:10+5:302022-09-26T20:55:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना काळजी घेण्याची सूचना
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अंबाबाई दर्शनासाठी काढण्यात येणाऱ्या पेड पासवर दिवाणी न्यायालयाने सोमवारी बंदी आणली. सह दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी निकाल दिला असून त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एखादी बाब जाहीर करताना त्याबाबत झालेल्या न्यायालयीन निकालांची पडताळणी करावी अशी सूचना केली. या निर्णयामुळे आता पेड पासवरील वादावर पडदा पडला आहे.
नवरात्रोत्सवात व्हीआयपी दर्शनाचा त्रास वाचावा व परस्थ भाविकांना वेळेनुसार दर्शन घेता यावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने २०० रुपयांना पेड पास काढण्यात येणार होते. त्याविरोधात पूजारी गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याची अंतिम सुनावणी साेमवारी दुपारी झाली, सायंकाळी ३ रे सह दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी निकाल दिला.
पैसे घेवून पास देणे व त्यासाठी स्वतंत्र दर्शन रांग करणे हे २०१० सालच्या निकालाविरोधात असल्याने ते बंद करण्यात यावे, पोलीस प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने विधी व न्याय खात्याने दिलेल्या अध्यादेशाचे पालन करावे असे म्हटले आहे. या प्रकरणातून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे नाव वगळ्यात यावे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत एखादी बाब जाहीर करताना त्याबाबत झालेल्या निकालांची पडताळणी करावी अशी सूचना केली आहे. मुनीश्वर यांच्यावतीने ॲड. नरेंद्र गांधी व ॲड. ओंकार गांधी यांनी काम पाहिले.