जिल्ह्यात सोमवारपासून बंदी आदेश जारी
By admin | Published: July 26, 2014 12:43 AM2014-07-26T00:43:34+5:302014-07-26T00:45:44+5:30
शहरातील टोलविरोधी आंदोलन, रमजान ईद, अण्णा भाऊ साठे जयंती व श्री जोतिबा श्रावणषष्ठी यात्रा, इत्यादी सण तसेच इतर पक्ष, संघटनांच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनांच्या अनुषंगाने
कोल्हापूर : शहरातील टोलविरोधी आंदोलन, रमजान ईद, अण्णा भाऊ साठे जयंती व श्री जोतिबा श्रावणषष्ठी यात्रा, इत्यादी सण तसेच इतर पक्ष, संघटनांच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनांच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७(३) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी २८ जुलै रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ते १० आॅगस्ट २०१४ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत खालीलप्रमाणेवर्तन करण्यास मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यत शस्त्रे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर सहज फेकून त्यांचा मारण्यासाठी उपयोग करणे, व्यक्ती, अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करणे, सार्वजनिक घोषणा देणे, पाच अगर पाचांहून जादा व्यक्तींंनी एकत्र जमा होण्यास, जमाव जमण्यास, मिरवणुका काढणे व सभा घेणे, आदींसाठी मनाई करण्यात आली आहे. आदेशाच्या कालावधीत साजरे होणारे सर्व सण, उत्सव, जयंती, इत्यादीसाठी जमा होणारा जनसमुदायस हा मनाई आदेश लागू नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.