लालमातीशी ‘ऋणानुबंध’ जपणारे बानगे -- वेगळ्या वाटेवरचं गाव

By admin | Published: May 15, 2017 12:45 AM2017-05-15T00:45:20+5:302017-05-15T00:46:32+5:30

कुस्तीपंढरी म्हणून राज्यभर ख्याती : मल्लांची खाण; अनेकांनी केले आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व

Banangee 'Lending' on Lalmaati - A village on a different path | लालमातीशी ‘ऋणानुबंध’ जपणारे बानगे -- वेगळ्या वाटेवरचं गाव

लालमातीशी ‘ऋणानुबंध’ जपणारे बानगे -- वेगळ्या वाटेवरचं गाव

Next

दत्तात्रय पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : वेदगंगा नदीच्या उत्तर तीरावर वसलेल्या बानगे (ता. कागल) या गावाने लाल मातीशी पिढ्यान्पिढ्या ‘ऋणानुबंध’ जपले आहेत. प्रत्येक घरात मल्लांची खाण असणाऱ्या या गावातील मल्लांनी उपमहाराष्ट्र केसरी, राष्ट्रकुल विजेते, आशियाई यासह १०० हून अधिक पदके व दोनशेहून अधिक सन्मानचिन्हे पटकाविली आहेत. येथील अनेक मल्लांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे कुस्ती पंढरी म्हणून जिल्ह्यासह राज्यभर ओळख असणाऱ्या या गावच्या लाल मातीतील सुवर्णपताका सदोदितपणे अटकेपार फडकत आहे.
शाळेच्या श्री गणेशाबरोबरच प्रत्येक मुलाला कुस्ती कलेचे धडे दिले जातात. त्याच्या बौद्धिक विकासाबरोबरच शरीरयष्टीकडे लक्ष दिले जाते. सुमारे ४५०० लोकवस्ती असणाऱ्या या गावामध्ये सध्या जय भवानी व हनुमान या दोन तालमी आहेत. जय भवानी तालमीमध्ये वस्ताद तुकाराम चोपडे, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, भाऊसो सावंत, अमर पाटील मार्गदर्शन करत आहेत. येथे सध्या ५० ते ७५ मल्ल कुस्ती कलेचे धडे घेत आहेत, तर हनुमान तालमीमध्ये वस्ताद शिवाजीराव जमनिक यांच्या मार्गदर्शनाखाली १२५ मुले कुस्तीचा सराव करत आहेत. या दोन्ही तालमींमध्ये अपुरी जागा आहे. त्यामुळे दोन शिफ्टमध्ये सराव घेतला जातो. पहाटे ४ वाजता. सर्व मुलांकडून ५ ते ६ कि.मी. अंतर धावण्याचा सराव करून घेतला जातो. त्यानंतर मोकळ्या मैदानावर व्यायामाचे प्रकार होतात. सकाळी ७ ते १० पर्यंत कुस्तीचा सराव लाल मातीसह मॅटवर घेतला जातो. दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत पुन्हा सराव घेतला जातो. यामध्येही ३ ते ५ पर्यंत महाविद्यालयीन ८० किलो वजनी गटातील मल्लांचा सराव घेतला जातो. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिकणारी मुले सरावाला सुरुवात करतात. शालेय वेळापत्रकाच्या सोयीनुसारच येथील सरावाचे वेळापत्रक ठरविले जाते.
स्वातंत्र्यपूर्वकाळापासून बानगे येथे कुस्तीसह मल्लखांब विद्येचे धडे मिळत होते. कै. कॉ. वसंतराव सावंत हे मल्लखांब विद्येत पारंगत होते. भाऊसाहेब सावंत, शिवाजी जमनिक, परशुराम ढेंगे, बाबू तेली, भिकाजी धनगर, शंकर भोपळे, बाळू कवडे, शंकर धनगर, शंकर कदम, सुरेश लंबे, चंद्रकांत बोंगार्डे, आनंदराव बोंगार्डे, विलास पाटील, साताप्पा डावरे, दत्तू ढेंगे, तानाजी बोंगार्डे, सुरेश सावंत, दिगंबर पाटील, हरी सांडूगडे, श्रीपती कवडे, दिनकर यादव यांच्यापासून कुस्तीपरंपरा अखंडितपणे सुरू आहे.
लाल मातीशी प्रामाणिकपणे नाळ जोडल्यामुळेच पिंपळगाव बुदु्रक येथील कौतुक डाफळे, आणूर येथील प्रीतम खोत, सूरज अस्वले (आणूर) यांसह उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, राष्ट्रकुल सुवर्णविजेता रणजित नलवडे यांना रेल्वेमध्ये
टी. सी. म्हणून सेवेत घेतले आहे. तसेच, लक्ष्मण मोरे, सचिन पाटील, उत्तम मगदूम, संदीप जठार, विनायक पाटील (म्हाकवे), रोहित हिसगडे, संदीप मेथे, श्रावण पाटील, आदींनाही नोकऱ्या मिळाल्या आहेत.


‘महाराष्ट्र केसरी’ची हुरहुर
राजकीय धडे ठळकपणे गिरविणाऱ्या कागल तालुक्यात कुस्तीमध्येही नामांकित मल्ल आहेत. तालुक्यात महाराष्ट्र केसरीची गदा आणण्यासाठी येथील पैलवानांनी खूप मेहनत घेतली, मात्र ते अपयशी ठरले आहेत. यामध्ये रामा माने (पिराचीवाडी) हे चारवेळा, तर रवींद्र पाटील (बानगे) हे चारवेळा उपमहाराष्ट्र केसरी झाले, तर कौतुक डाफळे (पिंपळगाव बुद्रुक) व महेश वरुटे (रणदिवेवाडी) यांनी तृतीय क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. परंतु, महाराष्ट्र केसरीची हुरहुर कायम आहे. त्यामुळे ही गदा पटकाविणाऱ्या मल्लाला एक लाख रोख व फेटा बांधून त्याचा सन्मान करण्याचा निर्णय वस्ताद शिवाजी जमनिक (बानगे) यांनी घेतला आहे.

गावकऱ्यांचे मिळतेय ‘हत्तीचे बळ’
शालेय स्पर्धेपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो, राष्ट्रकुल, महाराष्ट्र केसरी, आशियाई चषक अशी कोणतीही कुस्ती स्पर्धा असली तरी बानगेकरांचे याकडे डोळे लागलेले असतात.
या विविध स्पर्धेत येथील मल्ल ताकदीने उतरलेले असतात. तसेच, विजयी मल्लांचे स्वागत सवाद्य हत्तीवरून मिरवणूक
काढून त्यांना बळ देण्यातही येथील ग्रामस्थ मागे पडत नाहीत.


बानगेच्या परिसरालाही ‘परीसस्पर्श’
बानगे गावात घरा-घरांत मल्ल घडत आहेत. त्याचबरोबर परिसरातील आणूर, मळगे, सोनगे, गोरंबे, म्हाकवे, व्हनाळी, पिराचीवाडी, केनवडे, परिसरातील मुलेही बानगेतील लाल मातीत सराव करत आहेत. तसेच, नादवडे, खानापूर (भुदरगड), तळसंदे (वारणा), पन्हाळा, कवठेमहांकाळ, रेंदाळ, येथूनही काही मुले बानगे येथे राहून कुस्ती कलेत पारंगत होत आहेत.



‘निवासी कुस्ती संकुल’ उभारण्याची गरज
राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेली लाल मातीतील कला जिवंत ठेवण्यासाठी बानगेवासीय जिवाचे रान करत आहेत. येथील दोन्हीही तालमींतील मार्गदर्शक (प्रशिक्षक) विनामोबदला रात्रंदिवस कार्यरत आहेत. तरीही प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी या कुस्तीकलेची पीछेहाट होत आहे. येथे कुस्ती संकुलाची अनेक दिवसांपासून मागणी आहे. येथील तालमी अपुऱ्या आहेत. बाहेरून सरावासाठी आलेल्या मल्लांना राहण्याची स्वतंत्र्य व्यवस्था नाही. व्यायाम साहित्याचाही अभाव आहे. मैदानाची कमतरता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने येथे सर्व सोयीनीयुक्त, आधुनिक व्यायाम साहित्यांसह कुस्ती संकुल उभारावे, अशी मागणीही येथील ग्रामस्थांची आहे.


रवींद्र पाटील, नलवडे विविध पुरस्कारांनी सन्मानित
उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांनी ५ वेळा आंतरराष्ट्रीय, २५ वेळा राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. ते आशियाई सुवर्णपदक विजेते असून शासनाचा श्री शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. राष्ट्रकुलमधील सुवर्ण विजेता रणजित नलवडे यानेही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. त्याने १२१ सन्मानचिन्ह, ६० पदके, ३ दुचाकी पटकाविल्या आहेत. नलवडेलाही श्री शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे.

Web Title: Banangee 'Lending' on Lalmaati - A village on a different path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.