बँक दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या बेळगावच्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 02:27 PM2019-02-26T14:27:58+5:302019-02-26T14:30:18+5:30
कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बेळगाव येथील तिघा दरोडेखोरांसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांचा आणखी एक साथीदार अंधारात फायदा घेत पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. या टोळीकडे कळे येथील बँकेवरील दरोडा आणि कणेरीवाडी येथील वृद्धेचा खून करून लूटमार या दोन्ही गुन्ह्यांबाबत चौकशी सुरूआहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बेळगाव येथील तिघा दरोडेखोरांसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांचा आणखी एक साथीदार अंधारात फायदा घेत पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. या टोळीकडे कळे येथील बँकेवरील दरोडा आणि कणेरीवाडी येथील वृद्धेचा खून करून लूटमार या दोन्ही गुन्ह्यांबाबत चौकशी सुरूआहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित जिफान शाबुद्दीन अन्निवले (२३), रफिक खतालसाब पठाण (२३, दोघे रा. उज्ज्वलनगर, बेळगाव), मंजुनाथ बसवराज पाटील (२५, रा. वीरभद्रनगर, फस्टमेल बेळगाव), यासीन उस्मान धारवाडकर (२३, रा. शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार पळून गेला. त्यांच्याकडून कार, आॅक्सिजन सिलिंडर टाकी, घरगुती वापरातील गॅस टाकी, गॅसगन, दोन लोखंडी कटावण्या, दोन पक्कड, दोन कटर, लायटर, हेल्मेट, बॅटरी, माकड टोपी, हातमोजे, जर्किन, कॅन, पाईप, नंबरप्लेटा, कागदपत्रांचे झेरॉक्स, तीन मोबाईल असा सुमारे चार लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात महिन्याभरात घरफोडी, चोरीचे प्रकार घडत आहेत. सर्व पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपअधीक्षक कार्यालयांना रात्रगस्तीसह शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी चार विशेष पथके तयार करून, जिल्ह्यात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
रविवारी रात्री पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलजवळील उड्डाण पुलावर कार (एम. एच. ०७ बी-४४५) थांबून असून त्यामध्ये पाच लोक आहेत. त्यांच्या हालचाली संशयास्पद असून, ते चोरटे असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती खबऱ्याने पोलीस उपनिरीक्षक दादासो पवार यांना दिली. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कागलकडे धाव घेतली.
संशयित कारवर झडप टाकण्यासाठी पोलीस धावले असता, त्यांची चाहूल लागून दरोडेखोर पळून जाऊ लागले. यावेळी थरारक पाठलाग करून चौघांना पकडले. एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्यांच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये दरोड्याचे साहित्य सापडले. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बँकेची रेकी करून दरोड्याचा प्रयत्न
संशयित दरोडेखोरांकडे कसून चौकशी केली असता, एक महिन्यापूर्वी त्यांनी गडमुडशिंगी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेची रेकी केली होती. या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक असल्याने त्यांनी तेथील प्लॅन रद्द केला. त्यानंतर २० फेब्रुवारीला कागल येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची रेकी केली. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने रविवारी मध्यरात्री या बँकेवर दरोडा घालण्याचा प्लॅन होता, अशी कबुली संशयित जिफान अन्निवले याने दिली. त्यांनी यापूर्वी आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
कारचा नंबर बदलला
संशयितांकडे मिळून आलेल्या कारचा नंबर मूळ नंबर (एम. एच. ०९ एबी ९२६६) असा आहे. त्यांनी ही नंबरप्लेट काढून बनावट नंबर (एम. एच. ०७ बी-४४५) लावला होता. प्रत्येकवेळी ते नंबरप्लेट बदलून कर्नाटक-महाराष्ट्रात फिरत होते.