कोरोना लसीकरणाबाबत बँक कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:44+5:302021-04-17T04:23:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने सांगूनही स्थानिक प्रशासन बँक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देत नसल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने सांगूनही स्थानिक प्रशासन बँक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देत नसल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने बँक कर्मचाऱ्यांना तातडीने लसीकरण सुरू करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण काेरे यांनी पत्रकातून केले.
मार्च २०२०पासून कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन होते. या काळात सगळेजण घरीच बंदिस्त हाेते. मात्र, जनतेच्या सेवेसाठी कोरोनाशी लढा देत बँक कर्मचारी कामावर होते. यातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. काहीजणांना जीवही गमवावा लागला. बँक कर्मचाऱ्यांना कोराना योद्धा घोषित करून त्यांना प्राधान्याने लसीकरण करावे म्हणून विविध संघटना, संघ व असोसिएशनने सरकारकडे निवेदन दिले होते. केंद्र सरकारनेही लसीकरणाची सूचना केली होती. तरीही कर्मचाऱ्यांना लस दिली जात नाही. शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन निपुण कोरे यांनी केले आहे.