खासगीकरणाला विरोध; बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप, कोल्हापुरात १५०० कोटींचे व्यवहार होणार ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 01:52 PM2021-12-16T13:52:59+5:302021-12-16T13:54:56+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील बँक कर्मचारी १६ व १७ डिसेंबरला संपावर जात आहेत.
रमेश पाटील
कोल्हापूर : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी आज गुरुवारपासून दोन दिवस (दि. १६ व १७ डिसेंबर) बँक कर्मचाऱ्यांच्या संपातकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सर्वच राष्ट्रीयीकृत आणि काही खासगी बँकांचे मिळून दोन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसात सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील बँक कर्मचारी १६ व १७ डिसेंबरला संपावर जात आहेत.
मागील वर्षी अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. तेव्हापासून बँक कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून हा दोन दिवसांचा संप करण्यात येत आहे.
दरम्यान, बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेल्यामुळे त्यांचा दोन दिवसाचा पगार कापला जाणार आहे. वर्षभरात देशभरातील दहा लाख कर्मचारी किमान सात ते आठ दिवस संपावर जातात.
सरकारी बँका खासगी झाल्या तर...
सरकारी बँका खासगी झाल्या तर त्याचा बँकिंग क्षेत्रावर मोठा परिणाम होईल, असे बँक कर्मचारी संघटनांना वाटते. खासगीकरण झाल्यास नवीन खाते उघडायला पाच ते दहा हजार रुपये लागतील. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला बँकेत खाते उघडणे मुश्कील होईल. गरीब शेतकरी शेतमजुरांना कर्ज मिळणे दुरापास्त होईल. सरकारी योजनांपासून सामान्य जनता दूर राहील. सर्व जनतेच्या बचत ठेवी असुरक्षित होतील. ग्रामीण भागातील बँक शाखा बंद होतील.
लक्ष्मीपुरी शाखेसमोर निदर्शने
सरकारच्या या निर्णयाविरोधात आज, गुरुवारी व उद्या शुक्रवारी (दि. १६ व १७) सकाळी साडेदहा वाजता बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेसमोर सर्व बँकांचे कर्मचारी एकत्र जमून निदर्शने करणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेचे सूर्यकांत कर्णिक व संजय उलपे यांनी दिली.
क्लेअरिंग इफेक्ट तीन दिवस लेट
संपामुळे बँकांचे क्लिअरिंग गुरुवार, शुक्रवार दोन दिवस बंद राहणार आहे, तर शनिवारी एक दिवस बँक सुरू करणार असून, रविवारी पुन्हा साप्ताहिक सुट्टी आहे. या सर्व गोष्टीचा बँकांच्या क्लेअरिंगवर परिणाम होणार असून, क्लिअरिंग इफेक्ट तब्बल तीन दिवस पुढे जाणार आहे.