टर्न टेबल लॅडरसाठी बँक हमी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:31+5:302021-02-13T04:23:31+5:30
कोल्हापूर शहरात आता उंच इमारती होत आहेत, त्यांना बांधकाम नियमावलीतील तरतुदीनुसार परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु जेव्हा उंच ...
कोल्हापूर शहरात आता उंच इमारती होत आहेत, त्यांना बांधकाम नियमावलीतील तरतुदीनुसार परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु जेव्हा उंच इमारती होतात तेव्हा एखाद्या आपत्कालीन प्रसंगी महापालिकेची अग्निशमन दलाची यंत्रणा तेथपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता पालिका प्रशासनाने १० कोटी ५० लाखांचे टर्न टेबल लॅडर हे वाहन खरेदी करण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारने देखील त्यास मंजुरी दिली असून पन्नास टक्के रकमेपैकी चार कोटींचा निधीही महापालिकेकडे प्राप्त झाला आहे. उर्वरित एक कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे.
महानगरपालिका आपले स्वत:चे पाच कोटी रुपये या वाहनासाठी खर्च करणार आहे. टर्न टेबल लॅडर हे वाहन भारतात बनत नाही. त्यामुळे वाहन घेण्याकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविल्या होत्या. जर्मनतील मोराटा कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. वर्क ऑर्डर आल्यानंतर तसेच बॅक हमी मिळाल्यानंतर कंपनी वाहन तयार करते; परंतु महापालिका प्रशासनाने केवळ वर्क ऑर्डर दिली आहे. ‘लेटर ऑफ क्रेडिट’ अर्थात बँक हमी दिलेली नाही. प्रशासनाकडून ही हमी देण्यास विलंब होत आहे. जेव्हा अशी हमी दिली जाईल त्यानंतर संबंधित कंपनी वाहन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करेल. वाहन तयार होण्यास आठ ते नऊ महिने लागणार आहेत. त्यामुळे जेवढ्या लवकर बँक हमी दिली जाईल तेवढ्या लवकर हे वाहन अग्निशमन दलाच्या ताफ्यात येणार आहे.