बनावट सोने तारणावर बॅँकांची लुबाडणूक : जिल्हा बँक कसबा बीड, शिरोली दुमाला शाखेतही प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:09 AM2018-10-10T01:09:44+5:302018-10-10T01:10:42+5:30
कोल्हापूर : बनावट सोने तारण देऊन त्यावर कर्जाची उचल कणारे आंतरराज्य सराफांचे रॅकेट उघडकीस आणण्यात मंगळवारी पोलिसांना यश आले. अडीच किलो बनावट सोन्यावर सुमारे लाखो रुपयांच्या कर्जाची उचल विविध बॅँकांकडून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेच्या कसबा बीड व शिरोली दुमाला शाखेतही तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत व या बँकेच्या व्यवस्थापनाने त्यास दुजोरा दिला आहे. रॅकेट उघडकीस आल्याने जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेतले आहे.
बनावट सोने तारण देऊन सराफ व काही बॅँकांचे अधिकारी संगनमताने बॅँकांची फसवणूक करीत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार गेले दोन दिवस करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी काही सराफांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर कोणकोणत्या बॅँकांत बनावट सोने तारण दिले ते संबंधित सोनारांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित घटकांची कसून चौकशी सुरू केली आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील देवाच्या नावाने असलेल्या एका वाडीतील सोनारांचा समावेश असून पोलिसांच्या ‘प्रसादा’नंतर त्याने तोंड उघडले आहे.
त्यातील सोने परिसरातील काही लोकांना विकल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी मंगळवारी संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. हे सोने तारण देऊन संबंधितांनी जिल्हा बॅँकेच्या कसबा बीड शाखेतून दोघांनी, तर शिरोली दुमाला शाखेतून एकाने कर्ज उचल केल्याचे चौकशीत पुढे आल्याचे समजते. पोलिसांनी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीला बोलावले आहे. दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या कसबा बावडा शाखेत बनावट सोने तारण प्रकरणानंतर सोनार पोलिसांच्या टेहळणीवर होते. त्यातूनच हे रॅकेट ताब्यात घेतले असून, या धक्कादायक प्रकाराने बॅँकिंग क्षेत्र हादरून गेले आहे.
सोन्याचा मुलामा..
बनावट दागिन्यांना सोन्याचा मुलामा दिल्याने सोने तपासण्याच्या मशीनमध्ये त्यातील बनावटगिरी उघडकीस येऊ शकली नसल्याचे बँकेच्या संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. कसबा बावडा शाखेत असाच प्रकार घडल्यानंतर जिल्हा बँकेने सराफाऐवजी सोन्याची शुद्धता तपासणारी मशिन्स घेतली तरीही अशी फसवणूक झाल्याने खळबळ उडाली.
चोरीचे सोने तारण ठेवून आमच्या शाखांतून उचल केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने चौकशी करीत आहेत; पण ते सोने आम्ही मशीनद्वारे तपासूनच तारण घेतले.
- डॉ. ए. बी. माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक)
बनावट सोने तारण प्रकरणाबाबत काही सराफांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरू असून याबाबत आज, बुधवारी अधिकृत माहिती देऊ.
- सूरज गुरव (पोलीस उपअधीक्षक, करवीर)