संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प
By admin | Published: July 30, 2016 12:16 AM2016-07-30T00:16:16+5:302016-07-30T00:32:19+5:30
१५०० कोटींची उलाढाल थांबली : खासगीकरणाविरोधात अधिकारी, कर्मचाऱ्यांची निदर्शने
कोल्हापूर : देशातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या एकत्रीकरण व खासगीकरणाविरोधात शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांच्या ३५० शाखांनी बंद पाळला. ‘युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियन’च्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील बंदमध्ये अडीच हजार अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. या बंदमुळे धनादेश वटविणे, पैसे भरणे-काढणे, आदी स्वरूपांतील सुमारे १५०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
बँकिंग क्षेत्रात केंद्र सरकार करीत असलेले बदल जनविरोधी असल्याचा आरोप करीत ‘यूएफबीयू’ने या ‘बंद’ची हाक दिली. यूएफबीयूसह आॅल इंडिया बँक आॅफ इंडिया आॅफिसर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद व विविध बँकांच्या शाखांमधील अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता लक्ष्मीपुरीतील बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयासमोर जमले. याठिकाणी त्यांनी ‘बँकांचे एकत्रीकरण रद्द करा, रद्द करा’, ‘बोल मजुरा, हल्ला बोल, हल्ला बोल’ अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यानंतरच्या निषेध सभेत आॅफिसर्स असोसिएशनचे संयुक्त महासचिव अशोक चौगुले आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन चोडणकर बँक आॅफ इंडियाचे चंद्रकांत गुडसकर, सिंडिकेट बँकेचे मकरंद करंदीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम्प्लॉईज असोसिएशनचे जिल्हा सचिव विकास देसाई, रमेश कांबळे, संजय उलपे, सुरेश चिंदरकर, सूर्यकांत कर्णिक, आदी उपस्थित होते.
चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा
‘यूएफबीयू’च्या नेतृत्वाखालील बँकांच्या ‘बंद’मध्ये आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फडरेशन, आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फडरेशन आॅफ बँक एम्प्लॉईज, नॅशनल बँक आॅफिसर्स आॅर्गनायझेशन अशा विविध नऊ संघटना सहभागी झाल्याचे आॅफिसर्स असोसिएशनचे संयुक्त महासचिव अशोक चौगुले यांनी सांगितले. आॅफिसर्स असोसिएशनची दि. ९ आॅगस्टला दिल्लीत बैठक होणार आहे. त्यातील चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.