नोटबंदीचा निर्णय चर्मोद्योगाच्या मुळावर
By Admin | Published: December 23, 2016 12:36 AM2016-12-23T00:36:15+5:302016-12-23T00:36:15+5:30
६० टक्के उत्पादन घटले : ७५ टक्के कामगार बेरोजगार
आसिफ कुरणे --कोल्हापूर --नोटाबंदीच्या निर्णयाचा देशातील चर्मोद्योगाला मोठा फटका बसला आहे. चमड्यापासून तयार होणाऱ्या वस्तूच्या उत्पादनात ६० टक्के घट झाल्याने या उद्योगातील ७५ टक्के कामगार बेरोजगार झाल्याचे असोचेमच्या पाहणी अभ्यासात स्पष्ट झाले आहे. चमड्याच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार होतात. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखीच्या व्यवहारावर मर्यादा आल्याचा फटका या उद्योगाला बसला आहे. चेन्नईतील कातडे कमवण्याच्या कारखान्यामध्ये कातडे येण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. आग्रा, कानपूर आणि कोलकाता सारख्या लेदर क्लस्टरमध्ये हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत घसरले असल्याचे असोचेमने आपल्या पाहणी नमूद केले आहे. पाहणी अभ्यासानुसार कसाई लोकांनी रोख रक्कम मिळत नसल्याने मोठ्या उद्योगांना कातडे देणे बंद केले आहे. तसेच वाहतूकदारांना देण्यासाठी रोख रक्कम नसल्याने कातडे वाहतुकीवर व कोळसा नसल्याने बॉयलर विभागावर देखील विपरित परिमाण झाला आहे.
गेल्या १५ दिवसात आग्रा, चेन्नई, कानपूर आणि कोलकात्यातील जवळपास १०० कातडी कमावणाऱ्या उद्योगाच्या प्रतिनिधींशी असोचेमने नोटबंदीचा उद्योगावर झालेल्या परिणामाबाबत चर्चा केली. यातील ८५ टक्के लोकांनी नोटबंदीचा चर्मोद्योगाला जबर फटका बसल्याचे मान्य केले. रोकड उपलब्ध होत नसल्याने कच्चा माल, वाहतूक आणि कामगारांना पैसे देण्यात उद्योगांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांची घट झाल्याचे त्यांनी मान्य केले.
त्याचप्रमाणे वेळेत आॅर्डर पुर्ण करणे शक्य नसल्याने अनेक आॅर्डरी नाकारल्याचे ६० टक्के प्रतिनिधींनी सांगितले. पुढील काही महिने याचा परिणाम जाणवणार असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ९ ते १२ महिने लागतील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूरातील परिस्थिती....
कोल्हापुरातील चर्मोद्योगासाठी चेन्नईतून चमड्यांचा पुरवठा होतो. तेथे रोखीने व्यवहार करण्याची अनेक वर्षापासूनची पारंपारिक पद्धत आहे. तेथील व्यापारी डीडी, चेक, आॅनलाईन व्यवहाराने चमड्याचा पुरवठा करत नाही. त्याचा मोठा फटका कोल्हापुरातील चर्मोद्योगाला बसला आहे. सध्या येथील ३० टक्के उत्पादन घटले असून ही परिस्थिती येत्या महिन्याभरात आणखी बिकट होणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या चमड्यावर काही दिवस व्यवसाय चालेल पण त्यानंतर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल. नोटबंदीमुळे कातडी उत्पादनाची विक्री ४० टक्क्यांनी घटली आहे.
- भूपाळ शेटे, चर्मोद्योजक, कोल्हापूर