सलग सुट्ट्या तरी बँकांचे कामकाज सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:35+5:302021-03-30T04:13:35+5:30
आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असल्याने महिन्याचा शेवटचा आठवडा अर्थकारणाशी जोडलेल्या सर्वच बँका, व्यवसाय-उद्योग धंद्यांसाठी महत्त्वाचा असतो. बँकांमार्फत वर्षभर ...
आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असल्याने महिन्याचा शेवटचा आठवडा अर्थकारणाशी जोडलेल्या सर्वच बँका, व्यवसाय-उद्योग धंद्यांसाठी महत्त्वाचा असतो. बँकांमार्फत वर्षभर झालेली उलाढाल, दिलेली कर्जे, ठेवी, व्याज, एनपीए. सोने तारण, विविध योजनांद्वारे केलेला पतपुरवठा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नफा यांचा ताळमेळ या कालावधीत बसविला जातो. यात राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, सहकारी तसेच खासगी बँकांचाही समावेश आहे.
गेल्यावर्षी सुरू झालेल्या कोरोनाने अजूनही पाठ सोडलेली नसल्याने यंदा पतपुरवठा करणाऱ्या सर्वच व्यवस्थापनांना कर्ज वसुलीसाठी अडचणी येत आहेत शिवाय यावर्षीचे कर्जपुरवठा व नफ्याची उद्दिष्ट्य साधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना मोठ्या प्रमाणात थकबाकीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालयांचा कुबेर असलेल्या ट्रेझरी कार्यालयातही सेल्सटॅक्स, इन्कम टॅक्स, चलन, भरणा आदी कामांमुळे कर्मचारी कार्यालयात बसून आहेत, सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकांना तीन दिवस सुट्या असल्या तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे दिवस कार्यालयाचे कामकाज पूर्ण करण्यात घालविले.
----