कोल्हापूर जिल्ह्यात पीककर्जासाठी बँकांचा हात सैल : उद्दिष्टापैकी ९६ टक्के कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:09 AM2019-05-31T01:09:27+5:302019-05-31T01:09:53+5:30
कृषी कर्जपुरवठ्यात बँकांनी हात आखडता घेतल्याचे राज्यातील चित्र असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बँकांनी शेतकऱ्यांसाठी हात सैल सोडल्याचे आशादायी चित्र आहे. ३१ मार्चअखेर सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जपुरवठ्याची ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे
कोल्हापूर : कृषी कर्जपुरवठ्यात बँकांनी हात आखडता घेतल्याचे राज्यातील चित्र असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बँकांनी शेतकऱ्यांसाठी हात सैल सोडल्याचे आशादायी चित्र आहे. ३१ मार्चअखेर सहकारी, खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जपुरवठ्याची ९६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा सर्वाधिक आहे. बँकेने १३१ टक्के, तर राष्ट्रीय बँकांनी ६३ टक्के आणि खासगी बँकांनीही ४९ टक्के पीककर्ज देऊन शेतकऱ्यांची पत सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्याचा कृषी कर्जपुरवठ्याचा आढावा घेतला असता, गतवर्षीच्या आराखड्यापैकी केवळ ५४ टक्केच कर्जपुरवठा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (दि. २९) मंत्रालयातील आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय बँकांचा आकडा दोन ते पाच टक्केच आहे. याउलट जिल्हा बँकांनी ६८ टक्के कर्जपुरवठा केला आहे. या संदर्भाने जिल्ह्याची वस्तुस्थिती ताडून पाहिली असता, चित्र फारच आशादायी दिसते.
जिल्ह्यात ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ९६ टक्के कर्जपुरवठा केला गेला आहे. २ लाख २४ हजार ४६६ शेतकºयांना २२२० कोटी ७२ लाखांचा पीक कर्जपुरवठा झाला आहे. यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. उद्दिष्टपूर्ती करतानाच राज्यात सर्वाधिक १३१ टक्क्यांचा आकडाही गाठला आहे. जिल्ह्यातील एकूण होणाºया कर्जपुरवठ्यापैकी जवळपास ८० टक्के कर्जाचे वाटप एकट्या जिल्हा बँकेने केले आहे. बँकेने एक लाख ७७ हजार ५६८ शेतकºयांना १५९१ कोटी २६ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ६३ टक्के कर्जपुरवठा केला आहे. यात ३५ हजार ८३१ शेतकºयांना ४७१ कोटी १७ लाख, तर खासगी बँकांनी १० हजार ११६ शेतकºयांना १४७ कोटी ३० लाखांचे कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेचा कर्जपुरवठा यंदा कमी झाला असून, तो अवघ्या ४२१ शेतकºयांना एक कोटी ९९ लाख इतकाच आहे. तो एकूण आकडेवारीच्या २२ टक्केच आहे.
दरम्यान, तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के दराने दिले जाते. वेळेवर परतफेड केल्यास पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ घेता येतो. यावर्षी उसाची बिले दोन टप्प्यांत आल्याने कर्जफेडीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसत आहे. ऊस, सोयाबीन, केळी, भुईमूग, भात यांसह खरीप व रब्बी पिकांसाठी पीककर्जाचा पुरवठा होतो; पण अलीकडे या पीककर्जाच्या जोडीनेच ठिबक, जमिनीचा विकास, विहिरीसह सिंचन पाईपलाईन, यांत्रिकीकरणासाठी कर्ज घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे; पण त्यासाठीचा व्याजाचा दर मात्र जास्त असल्याने छोट्या शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागतो.
कृषी कर्जपुरवठ्याला प्राधान्य
उसासारखे नगदी पीक, सोसायट्यांचे गावपातळीवरील जाळे, शेतकºयांची कर्ज फेडण्याची मानसिकता, खासगी व राष्ट्रीय बँकांचे विस्तारलेले जाळे यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पीककर्जाचा आलेख कायमच चढा राहिलेला आहे. क.म. (कमाल मर्यादा)च्या निकषांपेक्षाही अधिक कर्जपुरवठा करूनही तो वसूल होण्याची खात्री असल्यानेच बँकांनी जिल्ह्यात कृषी कर्जपुरवठ्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्याचा लाभ शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
२०१८-१९ मधील पीककर्ज वाटप (लाखात)
बँक शेतकरी रक्कम टक्केवारी
जिल्हा बँक १७७५६८ १५९१२६ १३१
राष्ट्रीयीकृत बँक ३५८३१ ४७११७ ६३
खासगी बँक १०६१६ १४७३० ४९
ग्रामीण बँक ४२१ १०९९ २२
एकूण २,२४,४६६ २,२२,०७२ ९६