अत्यावश्यक सेवांतर्गत बँका उघडण्यास परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:57+5:302021-05-18T04:24:57+5:30
कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांतर्गत जिल्ह्यातील बँका उघडण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ ...
कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांतर्गत जिल्ह्यातील बँका उघडण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने सोमवारी केली. त्याबाबतचे निवेदन आमदार चंद्रकांत जाधव यांना ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे आणि सचिव धनंजय दुग्गे यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यावेळी त्या जिल्ह्यांमध्ये बँका सुरू होत्या. व्यापारी, उद्योजकांनी पूर्वीच पोस्ट डेटेड चेक्स दिलेले असतात. कोल्हापूर जिल्ह्याचे क्लिअरिंग हाऊस बंद आहे. मात्र, कोल्हापूर सोडून बाहेरून चेक्स क्लिअरिंगसाठी येणार आहेत. काही चेक सोमवारी आले आहेत. बँका बंद आहेत. पण, लोकल क्लिअरिंग सुरू आहे. बॅलन्सअभावी चेक परत जाण्याची शक्यता आहे. त्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांना बसणार आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत, तर दंड व व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. औषध व्यावसायिकांना अति अत्यावश्यक औषधे मागवताना एनईएफटी अथवा आरटीजीएसने ॲॅडव्हान्स पेमेंट करावे लागते. त्यामुळे बँकेची वेळ कमी असेल, तरी चालेल; पण बँका उघडण्याबाबतच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांनी सूचना करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चौकट
राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोल्हापूरसह कर्नाटकमधील कोरोना व अन्य रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात उपचार घेत आहेत. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमध्ये बँका बंद असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची अडचण होत आहे. त्याचा विचार करून कोल्हापुरातील जिल्हा, राष्ट्रीय, सहकारी बँका रोज किमान दोन ते तीन तास सुरू ठेवून या रुग्ण, नातेवाइकांना सहकार्य करावे. त्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे यांनी सोमवारी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
फोटो (१७०५२०२१-कोल-चेंबर निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी बँका उघडण्यास परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले. यावेळी धनंजय दुग्गे उपस्थित होते.
===Photopath===
170521\17kol_3_17052021_5.jpg
===Caption===
फोटो (१७०५२०२१-कोल-चेंबर निवेदन) : कोल्हापुरात सोमवारी बँका उघडण्यास परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले. यावेळी धनंजय दुग्गे उपस्थित होते.