साखरेची उचल थांबल्याने बँका अडकल्या दुष्टचक्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:32 AM2018-11-21T00:32:31+5:302018-11-21T00:32:36+5:30
कोल्हापूर : साखरेला बाजारात मागणीच नसल्याने नोव्हेंबरच्या कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच शिल्लक राहिली आहे. साखरेचा उठावच होत ...
कोल्हापूर : साखरेला बाजारात मागणीच नसल्याने नोव्हेंबरच्या कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच शिल्लक राहिली आहे. साखरेचा उठावच होत नसल्याने कारखानदारांबरोबरच बँकाही अडचणीत आल्या आहेत. साखर विक्रीतून कारखान्यांकडून येणारे कर्जाचे हप्ते थांबल्याने बँका दुष्टचक्रात अडकल्या आहेत.
केंद्र सरकारने साखरेचा किमान दर २९ रुपये केल्याने यंदा साखर उद्योगासमोरील अडचणी कमी होतील, असे वाटत होते. सरकारने साखरेचा दर बांधून दिला, पण त्याबरोबर साखर कारखान्यांना कोटा पद्धत दिली. त्यामुळे प्रत्येक महिन्याला कोट्याप्रमाणेच साखर विक्री करावी लागत आहे. दिवाळीनंतर साखरेचे मार्केट काहीसे थंड पडते आणि हळूहळू पूर्वपदावर येते; पण यंदा मार्केटमधील परिस्थिती वेगळी दिसत आहे. दिवाळी होऊन दहा-बारा दिवस झाले तरी मार्केट शांतच आहे. नोव्हेंबर महिन्यातील २0 दिवस संपले तरी कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. बाजारात साखरेला मागणी नसल्याने उठाव होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गत हंगामातील साखर पोत्यावर जिल्हा बँक, राज्य बॅँकेने कर्ज दिलेले आहे. बँकिंग धोरणानुसार साखर मूल्यांकनाच्या ८५ टक्के कर्ज द्यायचे असले तरी एफआरपी देण्यासाठी काही कारखान्यांना ९० टक्के कर्ज पुरवठा केलेला आहे. मुळात कोटा पद्धत आणि त्यात तेवढ्या साखरेलाही उठाव नसल्याने बँकांकडे परतावा आलेला नाही.
सध्या बाजारात २९३० रुपये प्रतिक्ंिवटल दर असला तरी त्या दरानेही कोणी घेईना, अशी परिस्थिती आहे. साखरेची उचल थांबल्याने कारखानदार अडचणीत आले असले तरी बँकाही अधिक दुष्टचक्रात सापडल्या आहेत. वसुलीच होत नसल्याने गाडा पुढे चालवायचा कसा? असा पेच बँकांसमोर आहे.
कमी दराने विक्रीची शक्यता
कोटा पद्धतीने साखर बाजारात येत असतानाही उठाव व्हायला पाहिजे; पण उठाव होत नाही याचा अर्थ व्यापाºयांना कमी दरात दुसरीकडे साखर उपलब्ध होत असावी असा निघू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.