डोळसांनाही लाजविणारा लिंगनूरचा ‘श्यामादा’..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:19 AM2018-01-01T00:19:48+5:302018-01-01T00:21:46+5:30
राम मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : हाता-पायांनी धडधाकट आणि डोळे असूनही अनेकांना जीवनाचा रस्ता सापडत नाही. परंतु, वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी जाऊनदेखील आपल्या स्वावलंबी जगण्याने डोळसांनाही लाजविणारा एक अवलिया गडहिंग्लज तालुक्यातील माळ लिंगनूर गावी आहे. पन्नाशीतील या जिद्दी माणसाचे नाव आहे सोमाण्णा मारूती घुगरे. मात्र, गावातील लहान-थोर मंडळी त्याला ‘श्यामादा’च म्हणून हाक मारतात.
त्याची जीवनकहाणी अशी, लिंगनूर काा नूल येथील स्व. मारूती घुगरे यांना ३ मुलगे आणि २ मुली. त्याची आई स्व. तायव्वा यांचे माहेर गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ. सोमेश्वर हे माद्याळचे जागृत ग्रामदैवत म्हणून आईने त्याचे नाव सोम्माण्णा ठेवले. ‘श्यामादा’ तिचा लाडका मुलगा. अंध असूनही त्याने अखेरपर्यंत आईची सेवा केली.
वयाच्या सहाव्या वर्षी त्याच्या अंगावर गोवर उठली. त्यामुळे आलेल्या थंडी, तापाने डोळे गेले आणि त्याच्या नशिबी अंधत्व आले. त्यामुळे तो शाळेत जावू शकला नाही. परंतु, शाळा शिकला नाही म्हणून त्याचे काहीही बिघडलेले नाही.
भांगलण सोडून शेतीची सर्व कामे तो करतो. उसाचे वाडे सोलणे, झाडांची साल काढणे, माती-वाळूच्या बुट्ट्या उचलणे, ऊसतोडणी टोळीतील इतर सहकाºयांच्या डोक्यावर उसाची मोळी उचलून देणे, आदी कामे तो लिलया पार पाडतो. त्यातून मिळणाºया मजुरीवरच त्याच्या कुटुंबाची गुजराण सुरू आहे. पोरा-बाळांच्या दुधासाठी आणि जोडधंदा म्हणून त्याने दोन म्हशीदेखील पाळल्या आहेत. त्यांचे चारापाणीदेखील तोच करतो.
करोशी (ता. चिक्कोडी) येथील त्यांची मोठी बहीण आव्वाक्का यांची मुलगी गंगुबाई यांनी मोठ्या धाडसाने आपल्या अंधमामाशी विवाह केला. वडिलोपार्जित शेती आणि मजुरीवरच त्यांची गुजराण सुरू आहे. त्यांची मोठी मुलगी लक्ष्मी ही प्रथम वर्ष पदवी शिक्षण तर मुलगा प्रकाश हा नववीत शिकत आहे. मुलांच्या आयुष्यात तरी उजेडाचे दिवस यावेत म्हणून त्याची अविरत धडपड सुरू आहे. दृष्ट लागेल असा संसार करणाºया कुटुंबाचा डोळस प्रमुख आहे...अंध ‘श्यामादा’.
खेळातही नैपुण्य !
‘नॅब’तर्फे मुंबईत आयोजित प्रशिक्षण शिबिरातील धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविलेला ‘श्यामादा’ कबड्डी व क्रिकेट संघातही खेळला. वैराग-सोलापुरातील कुस्ती स्पर्धाही जिंकली. कोल्हापुरात झालेल्या पोहणे स्पर्धेत त्याने यश मिळविले.
रोजगाराची अपेक्षा
अंगाने धडधाकट असणारा श्यामादा हमालीचे कामही करू शकतो. त्यामुळे गावालगतच्या गोकुळ दूध शीतकरण केंद्रातील पशुखाद्याच्या गोदामात किमान हमालीचे काम मिळावे, एवढीच त्याची अपेक्षा आहे.
पेन्शनपासून वंचित : श्यामादाचे वडील गडहिंग्लजच्या सरकारी एम. आर. हायस्कूलमध्ये शिपाई होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आईला पेन्शन मिळत होती; अलीकडेच तिचे निधन झाले. त्यामुळे वडिलांची पेन्शन बंद झाली आहे. तो शंभर टक्के अंध असल्यामुळे वडिलांची पेन्शन त्याला मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्या पेन्शनपासून तो वंचित आहे.