बापट कॅम्पमध्ये कुंभारवाड्याने घेतली पुन्हा उभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 05:16 PM2019-09-03T17:16:14+5:302019-09-03T17:22:56+5:30
पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे बापट कॅम्पमध्ये गणेशमूर्तींचे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आला होता. याही परिस्थितीवर मात करत बापट कॅम्प येथील कुंभारबांधवांनी महापुराच्या संकटावर मात करून अल्पावधीतच भाविकांना सुमारे वीस हजारांहून अधिक घरगुती व मंडळाच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या.
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे बापट कॅम्पमध्ये गणेशमूर्तींचे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आला होता. याही परिस्थितीवर मात करत बापट कॅम्प येथील कुंभारबांधवांनी महापुराच्या संकटावर मात करून अल्पावधीतच भाविकांना सुमारे वीस हजारांहून अधिक घरगुती व मंडळाच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या.
कोल्हापूरच्या संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प) गणेशमूर्ती तयार करण्याचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे केंद्र होय. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकात येथील गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी असते.
ही वसाहतच महापुराने कवेत घेतली होते. महिनो न महिने झटून बनविलेल्या मध्यम आणि मोठ्या आकाराच्या जवळपास सर्व गणेशमूर्ती पाण्यात गेल्या होत्या. या परिस्थितीवर मात करत अनेकांनी पुन्हा एकदा त्याच जोमाने भाविक व मंडळांच्या मागणीनुसार मूर्ती उपलब्ध करून दिल्या.
गणेश प्रतिष्ठापनेचा मुख्य दिवस सोमवार असल्याने बापट कॅम्प येथे सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तीसह मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोलपथके, धनगरी ढोल, झांजपथक आणि ब्रासबँडच्या सुरांनी आसमंत दुमदुमून गेला होता. शहर आणि ग्रामीण भागांतील काही सार्वजनिक तरुण मंडळांनी रात्रीपर्यंत या ठिकाणी गणेशमूर्ती नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
वर्षभरापासून आबालवृद्धांसह सर्वचजण गणरायांची वाट पाहत असतात. त्या आपल्या लाडक्या बाप्पांची. सोमवारी प्रतिष्ठापना करण्याचा मुख्य दिवस असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद व उत्साह पाहण्यास मिळत होता. बापट कॅम्प येथे पहाटे सहा वाजल्यापासूनच गणेशमूर्ती नेण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. सकाळपासून घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी लगबग सुरू होती. मात्र, दुपारी दोननंतर मंडळांची गणेशमूर्ती नेण्याची धांदल रात्री उशिरापर्यंत दिसून आली.
गणेशमूर्तीची कामे सुरूच..
आज जरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असली तरी बापट कॅम्पमध्ये ८० टक्के वसाहत महापुरात बुडाली. सुमारे ४० हजारांवर मध्यम आकाराच्या कच्च्या मूर्ती तर रंगविलेल्या २० हजारांवर मूर्ती जलमय झाल्या. याही परिस्थितीवर मात करत अनेकांनी मूर्ती तयार होण्यास वेळ लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेत अनेक मंडळांचे कार्यकर्ते आपली गणेशमूर्ती नेण्यासाठी दिवसभर या ठिकाणी थांबून होते.
पोलिसांचे नेटके नियोजन
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी बापट कॅम्प येथे नेटके नियोजन केले होते. येथील अंतर्गत वाहतूक एकेरी करण्यात आली होती. त्यामुळे येथील सार्वजनिक मंडळांना आपल्या मंडळाची गणेशमूर्ती नेणे सोयीस्कर होत होते.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी
बापट कॅम्प येथे मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर नागिरकांनी दिवसभर मोठी गर्दी केल्याने या व्यावसायिकांची गणेशोत्सवानिमित्त चांदी झाल्याचे पाहावयास मिळाले तसे पूजेचे साहित्य विक्रीचे स्टॉल या ठिकाणी लावले होते.
१६ फुटांपर्यंत गणेशमूर्ती
बापट कॅम्प एक फुटापासून १६ फुटांपर्यंत मूर्ती बनविल्या. घरगुती स्वरुपात मूर्ती तयार करणाऱ्यांची संख्याही येथे अधिक आहे तर काही गणेशमूर्ती परंपरेने विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेसाठी केल्या जातात. त्यामुळे अनेक नागरिक कित्येक वर्षांपासून येथून मूर्ती नेण्यासाठी येतात.
बापट कॅम्प येथील महापरामुळे कुंभारबांधवांच्या गणेशमूर्तीचे नुकसान झाले असले तरी जिद्दीने पुन्हा एकदा भरारी घेत, अत्यंत अल्प वेळेत पुन्हा एकदा परिश्रमपूर्वक सुबक मूर्ती भाविकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
- सुरेश करंजेकर, नागरिक
बापट कॅम्पमध्ये प्रत्येक कुटुंबांत पिढीजात गणेशमूर्ती तयार केल्या जातात. त्यामुळे पारंपरिक मूर्ती करण्याचे प्रमाण जास्त आहेत. यंदाची पूरस्थिती लक्षात अनेकांनी दरवर्षीप्रमाणे हाच रंग लावा, अशा स्वरूपात मूर्ती करा असा हट्ट न करता जी मूर्ती उपलब्ध आहे तिची प्रतिष्ठापना करून अनेकांनी या बांधवांना हातभार लावला आहे.
उत्तम जाधव,
उद्योजक