बाप्पा आले घरी; महापुरातून उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:36 AM2019-09-03T00:36:07+5:302019-09-03T00:36:11+5:30

ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर, अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारा... मखर, विद्युत रोषणाई, फुला-पानांनी सजलेली सुंदर आरास... आरती, खीर-मोदकांसह पंचपक्वानांचा नैवेद्य... फटाक्यांची ...

Bappa came home; Emerging from the floodplain | बाप्पा आले घरी; महापुरातून उभारी

बाप्पा आले घरी; महापुरातून उभारी

Next

ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर, अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारा... मखर, विद्युत रोषणाई, फुला-पानांनी सजलेली सुंदर आरास... आरती, खीर-मोदकांसह पंचपक्वानांचा नैवेद्य... फटाक्यांची आतषबाजी आणि आबालवृद्धांच्या चेहºयावर ओसंडून वाहणाºया उत्साहात सोमवारी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. यानिमित्ताने महिन्याभरानंतर महापुराच्या संकटातून सावरलेल्या कोल्हापूरकरांच्या घरादाराला पुन्हा एकदा नवचैतन्य, मांगल्य, सुख-समृद्धीचे तोरण बांधले गेले.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा श्रावण महापूर झेलण्यात आणि त्यातून सावरण्यात गेला; पण भाद्रपदमध्ये सहा दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपती बाप्पांनी महापुराचे मळभ दूर करत पुन्हा एकदा आपल्या भक्तांवर सुखाचा वर्षाव केला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आरास सजविण्यात गुंतलेल्या नागरिकांची सोमवारी पहाटेपासूनच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली. सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये भाविकांची आपल्या आवडत्या देवाला घरी नेण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक कुटुंबांनी बाप्पाला घरी नेण्याचा मान घरच्या मुलींना आणि स्त्रियांना दिला.
लहान मुले व पुरुषांनी डोक्यावर फरची टोपी, झब्बा परिधान केला होता तर मुलींनी भरजरी पारंपरिक ड्रेस, महिलांनी नऊवारी, सहावारी साडी, केसात गजरा, साजश्रृंगार केला होता. वयोवृद्धांपासून ते लहानग्यांपर्यंत अवघे कुटुंब डोक्यावर ‘गणपती बाप्पा मोरया’ची पट्टी बांधून, तर कुणी फेटा घालून बाप्पांना आणण्यासाठी तयार झाले होते. त्यामुळे गंगावेस कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर गर्दीने फुलला होता. यावर्षी उपनगरांतही अनेक ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे उपनगरांतील नागरिकांची त्याच ठिकाणी सोय झाली. परिणामी कुंभार गल्लीत अपवाद वगळता गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली नाही.
पाना-फुलांनी सजलेल्या हातगाड्या, दुचाकी, चारचाकी, बग्गी, रथ अशा विविध प्रकारच्या वाहनांसह वाद्याच्या गजरात चालत बाप्पांना नेणाऱ्यांची संख्या अधिक होती. दुपारी बारा वाजल्यानंतर मात्र गर्दी कमी झाली. अधून-मधून कोसळणाºया पावसाच्या सरी झेलत भाविकांनी गणपती बाप्पांना घरी नेले.

बाप्पांचा मान
मुली, महिलांना
गणेशमूर्ती कुटुंबातील पुरुषांनीच आणावी, असा अलिखित नियम आपल्याकडे रूढ आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत या विचारसरणीला छेद देत अनेक मुली, महिलांनी बाप्पांचे सारथ्य केले. पारंपरिक वेशभूषेत बाप्पांना स्वहस्ते घरी आणत यानिमित्ताने समानतेचा संदेशच जणू देण्यात आला.
रिक्षाचालकांची
मोफत सेवा
शहरातील सुमारे २५ रिक्षाचालकांनी गणेशमूर्ती घेतलेल्या भाविकांना मोफत रिक्षासेवा सोमवारी दिवसभर दिली. शहरातील विविध परिसरात त्यांनी सेवा पुरविली. भाविकांनी त्यांचे आभार मानले. या रिक्षाचालकांच्या या सेवेमुळे सामाजिक बंध दृढ झाले.

Web Title: Bappa came home; Emerging from the floodplain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.