कोल्हापुरात बाप्पा निघाले गुपचुपच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 01:24 PM2020-09-01T13:24:47+5:302020-09-01T13:42:23+5:30
कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही की त्यांच्यातील ओसंडणारा उत्साह, पारंपारिक वाद्य नाहीत की साऊंड सिस्टीम, बघ्यांची गर्दी नाही की मोठी मिरवणुक तरीही भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा गुपचुप आपल्या गावी निघाले.
कोल्हापूर : कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही की त्यांच्यातील ओसंडणारा उत्साह, पारंपारिक वाद्य नाहीत की साऊंड सिस्टीम, बघ्यांची गर्दी नाही की मोठी मिरवणुक तरीही भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा गुपचुप आपल्या गावी निघाले.
गेल्या दहा दिवसापासून अत्यंत साधेपणाने तसेच घरगुती स्वरुपात साजरा झालेल्या यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता विसर्जनाने मंगळवारी झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुक तसेच गर्दी टाळ्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले होते, त्याला कोल्हापुरातील सार्वजनिक मंडळांनी तसेच जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद देत एक जबाबदार नागरिकत्वाची भुमिका निभावली.
एरव्ही गणेशोत्सव म्हटले की, कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह, वाद्यांची रेलचेल, साऊंड सिस्टीमचा छातीत धडकी भरवणारा आवाज, मिरणुकीतील भव्यता, मंडळाच्या कार्यकर्य्यांची वेगळेपण जपण्यासाठीची धडपड, मिरवणुकी पाहण्यासाठी लाखो अबालवृध्दांची गर्दी, बाप्पांना निरोपाचे श्रीफळ देण्यामधील चढाओढ, लाऊड स्पिकरवरुन जागोजागी होणारे बाप्पाचे स्वागत आणि या सगळ्यातून निर्माण होणारा गगनभेदी गलगलाट या सगळ्याला फाटा देत सार्वजनिक गणपतींची विसर्जन सुरु होते.
कोरोनाचा धडकी, प्रशासनाने केलेले आवाहन याचा परिणाम म्हणून गेल्या शंभर एक वर्षातील शांततेत झालेल्या गणपती विसर्जनाचा हा पहिलाचा प्रसंग आहे.
मिरवणुक काढायची नाही, विसर्जनासाठी केवळ चारच कार्यकर्त्यांना परवानगी असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासून गणपती विसर्जन सोहळा येथील इराणी खाणीवर सुरु झाला.
या ठिकाणी दोन्ही खाणी बॅरीकेड, कनाती मारुन प्रवेश बंद करण्यात आल्या होत्या. तेथे केवळ मोजक्याच कार्यकर्त्यांनी विसर्जनासाठी सोडण्यात येत होते. दोन्ही खाणीत गणपती विसर्जनाची जबाबदारी पोलिस, महानगरपालिका अग्निशमन दल, व्हाईट आर्मी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी पार पाडली.
विसर्जनावेळी मोठे तराफे, छोट्या नावा यांची सोय करण्यात आली होती. सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाच्या तसेच व्हाईट आर्मीच्या रेस्क्यू बोट ठेवण्यात आल्या होत्या.
यंदा एकाच ठिकाणी विसर्जन
प्रत्येक वर्षी पंचगंगा नदी, इराणी खाण, राजाराम तलाव, कोटीतिर्थ तलाव आदी ठिकाणी गणपती विसर्जन पार पडते. परंतू यंदा गर्दी टाळण्याच्या हेतूने केवळ इराणी खाणीतच गणपती विसर्जन करण्यात येत होते.
बाकीच्या ठिकाणी बॅरिकेड लावून परिसर बंद करण्यात आले होते, तसेच त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. त्यामुळे केवळ रंकाळा तलावा लगतच्या दोन इराणी खाणीत विसर्जन सुरु होते.
पंचगंगा नदीवर शंभर वर्षात प्रथमच विसर्जन नाही
गणपती विसर्जन आणि पंचगंगा नदी यांचे अतुट नाते आहे. प्रदुषण टाळण्याच्या हेतूने अनेक वेळा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मंडळांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रदिर्घ काळ चालत आलेल्या नदीतील विसर्जनात कधीही खंड पडला नाही. परंतु यंदा कोरोनामुळे पंचगंगा नदीवर विसर्जनाला पूर्णत: बंदी घातली गेल्यामुळे अलिकडील शंभर वर्षात प्रथमच नदीच्या पाण्यात गणपतींचे विसर्जन झाले नाही.
नदीतील विसर्जनाची परंपरा खंडीत झाली. शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करत आज्ञापालनाचे कर्तव्य नि:संकोचपणे पार पाडून संकटाच्या काळातही एक आदर्श घालून दिला.
मानाचा गणपती दारात विसर्जित
मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाचा मानाच्या गणपतीचे मंडळाच्या दारातच विसर्जन करण्यात आले. परंपरा खंडीत होऊ नये म्हणून शंभर मिटर अंतर गणपतीची मूर्ती पालखीतून वाहून नेण्यात आली, आणि तेथे निर्माण केलेल्या कृत्रीम कुंडात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
सकाळी सव्वा दहा वाजता झालेल्या या विसर्जन सोहळ्यास महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक विजय सूर्यवंशी, नगरसेक संभाजी जाधव यांच्यासह मंडळाचे पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते.