बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या...
By admin | Published: September 22, 2015 12:15 AM2015-09-22T00:15:39+5:302015-09-22T01:00:01+5:30
जिल्ह्यात गौरी-गणपतीला निरोप : घरगुती गणेशमूर्ती, निर्माल्य दान उपक्रमास प्रतिसाद
गडहिंग्लज/ जयसिंगपूर/ शिरोळ : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’च्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, बेंजोंच्या निनादात सोमवारी जिल्ह्यात लाडक्या गणरायाला भाविकांनी भक्तिमय व जड अंत:करणाने निरोप दिला. नदीघाट, तलाव, पाणलोट परिसरात सायंकाळी पाचनंतर नागरिकांनी गौरी-गणपतीचे विसर्जन केले. मूर्ती आणि निर्माल्यदानास देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला.गडहिंग्लज येथे पाणी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगरपालिकेतर्फे खास निर्माल्य कुंडाची व गणपती विसर्जनासाठी जलकुंड ठेवण्यात आले होते. काही गणेशभक्तांनी जलकुंडात मूर्तींचे विसर्जन करून मूर्तिदान केल्या. दरवर्षी भाविकांकडून नदीकाठावर मूर्र्तींचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे पाणीपातळी खाली गेल्यावर याठिकाणी मूर्तीची अवहेलना होत होती. त्यामुळे पालिकेने यावेळी खास जलतराफा तयार करून सर्व मूर्ती नदीमध्ये विसर्जित केल्या. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नदीघाटावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी काहिली, तर निर्माल्य विसर्जनासाठी ट्रॅक्टर ट्रॉल्यांची व्यवस्था केली होती. नगराध्यक्ष राजेश बोरगावे, गटनेत्या प्रा. स्वाती कोरी, नगरसेवक दादू पाटील, नरेंद्र भद्रापूर, बाळासाहेब वडर, उदय पाटील, मुख्याधिकारी तानाजी नरळे, आदींसह कर्मचाऱ्यांनी गणेशभक्तांना मूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हलकर्णीत शांततेत विसर्जन
गडहिंग्लज पूर्व भागातील हलकर्णी परिसरात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात हलकर्णीसह नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, खणदाळ, बसर्गे, नूल, आदी गावांतील नागरिकांनी हिरण्यकेशी नदीत ‘श्रीं’चे विसर्जन केले.
आजऱ्यात जल्लोषात निरोप
आजरा शहर व तालुक्यात जल्लोषात गौरी-गणपतीचे विसर्जन झाले. आतषबाजी व वाद्यांच्या गजराने बाजारपेठेने ताबा घेतला होता. शिवाजीनगर घाट, व्हिक्टोरिया व संताजी पूल परिसर, वडाचा गोट येथे गणेशास निरोप देण्यात आला. श्री रवळनाथ देवालयातील मूर्तीच्या विसर्जनानंतर घरगुती गणेशमूर्र्ती रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीने येत त्यांचे विसर्जन झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. कुमार गल्ली, लिंगायत गल्ली, नाईक गल्ली, हरिजन वसाहत, चर्मकार गल्ली येथील गणेशमूर्ती मिरवणुकीने नेण्यात आल्या. विसर्जन कालावधीत निर्माल्य गोळा करण्याकरिता आजरा सूतगिरणीने ठिकठिकाणी आपले कर्मचारी तैनात केले होते.
चंदगडमध्ये शांततेत विसर्जन
‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’, आदी घोषणांनी तालुक्यातील नागरिकांनी भक्तिमय वातावरणात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले. ताम्रपर्णी नदीकाठावर दुपारनंतर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दुपारी पावसाने हजेरी लावल्याने काहींनी भिजतच मूर्तींचे विसर्जन केले.
अडकूर परिसरात विसर्जन
दरवर्षी विहीर, ओढ्यांमध्ये करण्यात येणारे विसर्जन यंदा अपुऱ्या पावसामुळे अडकूर, विंझणे, पोरेवाडी, आमरोळी, सातवणे, आदी गावांसह परिसरातील भाविकांनी यंदा ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन घटप्रभा नदीत केले.
नेसरी परिसरात उत्साहात विसर्जन
नेसरी : नेसरी, मासेवाडी, दुगुनवाडी, लिंगनूर, हेब्बाळ-जलद्याळ, तारेवाडी, काळामवाडी, तावरेवाडी, अर्जुनवाडी येथील परिसरात भाविकांनी सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन केले. अर्जुनवाडी, सांबरे, कुमरी गावंतील घरगुती मूर्तींचे विसर्जन उत्साहात झाले. पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिप्पूरला काहिलीत विसर्जन
शिप्पूर तर्फ नेसरी व हेब्बाळ-जलद्याळ येथे ग्रामस्थांनी सामूदायिकरीत्या काहिलीत मूर्तींचे विसर्जन केले. शिप्पूरच्या सरपंच राजश्री गुरबे, हेब्बाळचे सरपंच अरविंद दावणे यांच्यासह बाबूराव गुरबे, विद्याधर गुरबे, अनिल शिखरे, भरमा गुरव, वाय. एस. नाईक, आदींनी ग्रामस्थांना आवाहन केल्याप्रमाणे २५० घरगुती गणपतींचे विसर्जन झाले.
नेसरीसह सांबरे, कुमरी, तावरेवाडी, तारेवाडी, अर्जुनवाडी, काळिंद्रे गावांतील निर्माल्य पाण्यात न टाकता एकत्रित करण्याचे आवाहन ‘मविप’तर्फे करण्यात आले. पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंत कोलेकर, माजी प्राचार्य एस. एस. मटकर, एस. एन. सावंत, जे. व्ही. निचळ, प्रल्हाद माने, प्रा. एस. बी. चौगुले यांनी मूर्तिदान करण्याचे आवाहन केले.
करंबळीत २५० मूर्तिदान
करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत, राजे ग्रुप, महालक्ष्मी तरुण मंडळ, शिवप्रेमी तरुण मंडळ, झुंजार ग्रुप व ईगल ग्रुप यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांना गणेशमूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले. बसस्थानाकावरील बाळनाथ डेअरीसमोर खास मंडप उभारून विसर्जनासाठी काहिली ठेवण्यात आली होती. सरपंच रेखा शेरेकर, माजी उपसरपंच प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. २५० मूर्तींचे दान झाले होते.
जयसिंगपूर, शिरोळमध्ये मूर्तिदान
जयसिंगपूर/शिरोळ : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’च्या जयघोषात सोमवारी दिवसभर जयसिंगपूर, शिरोळसह तालुक्यात घरगुती व काही सार्वजनिक मंडळांनी देखील गौरी आणि गणपतींचे विसर्जन केले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनला यंदाच्या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिरोळ येथे पंचगंगा घाटावर श्री दत्त कारखाना व ग्रामपंचायतीच्यावतीने निर्माल्य टाकण्यासाठी काहिली व ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामस्थांनी २००० गणेशमूर्ती दान केल्या, तर चार ट्रॉली निर्माल्य गोळा झाले आहे. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचगंगा घाटावर भेट दिली. शिरोळ, कनवाड, घालवाड, उदगाव येथील ग्रामस्थांनी मूर्ती दान केल्या. गेले पाच दिवस मंगलमय आणि भक्तीने श्री गणेशाची पूजा, अर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)