बाप्पा चालले आपल्या गावाला, घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:06 PM2020-08-27T17:06:44+5:302020-08-27T17:09:38+5:30
गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.
कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.
ज्या गणरायाची भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहतात, त्या गणपतीचे आगमन झाले. यंदा कोरोनाचे संकट दारादारांत असताना देवाच्या स्वागतात आणि धार्मिक विधीत मात्र कोणतीही कमतरता ठेवू न देता कोल्हापूरकरांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. घरोघरी सुंदर आरास सजली.
आपापल्या पातळीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नागरिकांनी या सणाचा आनंद लुटला. बाप्पांचा पाच दिवस भक्तांच्या घरी छान पाहुणचार झाला. गणपतीपाठोपाठ गौरी आणि शंकरोबाही आले. या परिवार देवतांचे पूजन झाले. पंचपक्वान्नांचा नैवेद्य झाला. आज, गुरुवारी सहाव्या दिवशी भाविकांना जड अंत:करणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला. गणपतीबरोबरच गणोबा, ज्येष्ठा गौरी आणि शंकरोबाचेही विसर्जन झाले.
यंदा कोल्हापुरात गणेश विसर्जन काहिलीत
सकाळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर निलोफर आजगेकर यांच्या हस्ते गणेशाची आरती करून मिरजकर तिकटी येथून गणेश विसर्जनाला सुरवात झाली. बालगोपाल तालिम येथे मान्यवरांच्या हस्ते काहिलीमध्ये पंचगंगेचे पाणी ओतून विसर्जनाला सुरवात झाली आहे.
दरवर्षी पंचगंगा नदीघाट, रंकाळा, कळंबा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक येऊन आपापल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने नागरिकांना आपापल्या भागातच गणेशमूर्तीचे विसर्जन करा असे आवाहन केले. त्यासाठी ठिकठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी काहिली व विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली. कोल्हापूर शहरासाठी महापालिका व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विसर्जनाचे नियोजन करण्यात आले.
घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन असल्याने या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीसह अन्य तलावांत गणेशमूर्ती विसर्जनाला मनाई केली आहे. शहरातील रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, राजाराम या तलावांत प्रवेशबंदी करण्यात आली होती, यामुळे भाविकांनी विसर्जन कुंडांतच मूर्तींचे विसर्जन केले.
घरगुती गौरी-गणपती विसर्जनाला आज, गुरुवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. विसर्जन करताना गर्दीतून न कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा काम करीत होती.
गणेश विसर्जनाला भाविकांनी नदी, तलावांच्या ठिकाणी न जात आपल्या प्रभागातच महापालिकेच्या वतीने ठेवलेल्या विसर्जन कुंडांचा वापर करत प्रशासनाला सहकार्य केले. येथे विसर्जित मूर्ती तसेच मूर्तिदानातून जमा होणाऱ्या मूर्तींचे विधीवत विसर्जन इराणी खणीमध्ये करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे.
नदी, तलाव परिसरात बॅरिकेडिंग
पंचगंगा नदीघाटावर जाणारा मार्ग, रंकाळा, कळंबा, राजाराम, कोटीतीर्थ या तलावांच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते. विसर्जनासाठी नदी, तलावाच्या जाण्यास सर्वांना प्रतिबंध करण्यात आले. भाविकांनीहि आपापल्या प्रभागांत विसर्जन कुंडांत गणेशमूर्ती विसर्जित केल्या.