बाप्पा चालले गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:25 AM2021-09-19T04:25:50+5:302021-09-19T04:25:50+5:30
कोल्हापूर : आपल्या आगमनाने भक्तांमध्ये उत्साह, ऊर्जा निर्माण केेली आणि दहा दिवस पाहुणचार घेतलेल्या गणपती बाप्पांना रविवारी जड अंत:करणाने ...
कोल्हापूर : आपल्या आगमनाने भक्तांमध्ये उत्साह, ऊर्जा निर्माण केेली आणि दहा दिवस पाहुणचार घेतलेल्या गणपती बाप्पांना रविवारी जड अंत:करणाने निराेप द्यावा लागणार आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच घरगूती गणेशमूर्तींचेही रविवारी विसर्जन होणार असून, पर्यावरणपूरक उत्सवाचा पुढचा अध्याय लिहिण्यासाठी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कुंडात करून कोल्हापूरकरांनी पर्यावरणोत्सव साजरा केल्यानंतर आता सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचेही अशाच पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. यंदा मिरवणुकांना बंदी आहे, त्यातही महाद्वार रोडवर येण्यासाठी मंडळांची ईर्षा रोखण्यासाठी यंदा महाद्वारच बंद करण्यात आले आहे. पंचगंगा घाट, रंकाळा अशा जलाशयांच्या ठिकाणी विसर्जनाला बंदी आहे. मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन थेट इराणी खणीत करण्यात येणार असून, गणेशमूर्तींसोबत केवळ १० कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. इराणी खण येथे फक्त पाच कार्यकर्ते उपस्थित असतील असे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन करून मंडळांच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात होईल.
ज्या मंडळांना दारातच मूर्ती विसर्जित करायची असेल त्यांच्या गणेशमूर्तीचे महापालिकेच्या वतीने इराणी खणीत विसर्जन केले जाईल. इराणी खणीवर येणाऱ्या मूर्तींची संख्या अधिक असल्याने येथे पारंपरिक पद्धतीसोबतच यांत्रिकी पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनामुळे यंदा मिरवणुका, डामडौल नसल्याने साधेपणाने हा सोहळा होणार आहे. दहा दिवस उत्सव शांततेत पार पडल्यानंतर विसर्जनही अशाच रीतीने व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
----