‘बापसे बेटा सवाई’ कोल्हापूरचा रेफ्रीसम्राट--राजेंद्र दळवी (सीनिअर)

By admin | Published: February 19, 2017 01:18 AM2017-02-19T01:18:35+5:302017-02-19T01:18:47+5:30

त्या काळात या चार रेफ्रींचा मोठा दरारा होता. ही चौकडी म्हणजे योग्य निर्णय. यांच्या काळात सामन्यात सहसा भांडणे होत नसत.

'Bapse Son Sawai' - Referee of Kolhapur - Rajendra Dalvi (Senior) | ‘बापसे बेटा सवाई’ कोल्हापूरचा रेफ्रीसम्राट--राजेंद्र दळवी (सीनिअर)

‘बापसे बेटा सवाई’ कोल्हापूरचा रेफ्रीसम्राट--राजेंद्र दळवी (सीनिअर)

Next

राजू दळवी (सीनिअर) यांनी कोल्हापुरात रेफ्रीच्या कामाला दर्जा मिळवून दिला. रेफ्री म्हणून काम करताना सामन्यात तुमची पहिली व्हिसल कशी वाजते यावर तुमचा सामन्यावरील कंट्रोल ठरतो, असे राजूचे निरीक्षण आहे. त्यामुळे मी पहिली व्हिसल इतक्या दणक्यात आणि आत्मविश्वासाने वाजवितो की, त्याचे इम्प्रेशन शेवटच्या व्हिसलपर्यंत टिकून राहते, असे राजूचे म्हणणे आहे.

कोल्हापुरात पूर्वी संस्थान काळात काही कडक आणि दरारा असणारे रेफ्री (फुटबॉल पंच) होऊन गेले. कै. कॅप्टन नारायण सिंंग, कै. पापा परदेशी, कै. निजाम मोमीन व कै. भीमराव दळवी. त्या काळात या चार रेफ्रींचा मोठा दरारा होता. ही चौकडी म्हणजे योग्य निर्णय. यांच्या काळात सामन्यात सहसा भांडणे होत नसत. कै. भीमराव दळवी यांचाच सुपुत्र राजेंद्र दळवी. फुटबॉल खेळाडू आणि सॉकर रेफ्री म्हणून प्रसिद्धीस आला. याला राजेंद्र दळवी (सीनिअर) म्हणतात. कारण आणखी एक राजेंद्र दळवी या क्षेत्रात पंच व फुटबॉल खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची उंची कमी असल्याने तो ज्युनिअर राजू. राजेंद्र भीमराव दळवी याचा जन्म ३ जानेवारी १९६३. राहण्याचे ठिकाण गुलाब गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर. राजूचे वडील फुटबॉल खेळाकडे आकर्षित झाले. त्या काळात याच पेठेत व कोल्हापुरात प्रॅक्टिस क्लब (काळा + पांढरा)चा फार मोठा दबदबा होता. त्यामुळे राजू लहान असल्यापासून फुटबॉल खेळू लागला. प्राथमिक शाळा रा. ना. सामाणी विद्यालयास असताना लहान चेंडूच्या साहाय्याने फुटबॉल आपल्या सवंगड्यांसह खेळू लागला. त्यात तो चांगलाच पारंगत झाला. पुढे त्याच संस्थेच्या स. म. लोहिया या हायस्कूलमध्ये एल. डी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शालेय स्पर्धेत मनमुराद फुटबॉल खेळला; पण त्याला शालेय स्तरावर राज्य संघात गोलकिपर म्हणून चमकता आले नाही. राजूची उंची वडिलांसारखीच सहा फुटांपेक्षा अधिक असल्याने लहान मुलांच्या ४’-११’’ उंचीच्या मापाच्या स्पर्धांमध्ये फार काळ खेळता आले नाही.
पदवी शिक्षणासाठी राजू दळवीने न्यू कॉलेज या महाविद्यालयात प्रवेश घेतला. साहजिकच कॉलेज संघात त्याची गोलकिपर या ठिकाणी निवड झाली. सहा फुटांपेक्षा अधिक उंची, भरदार शरीर, गोरा रंग, सरळ नाक, उभट चेहरा, डोळ्यात आत्मविश्वासाची चमक, व्यायामामुळे रापलेले शरीर, धावगती आणि स्टॅमिना चांगला. उंचीने आणि कृतीने ‘बापसे बेटा सवाई’. गोलपोस्टमध्ये उभा राहिल्यास सहज हात आडव्या बारला पोहोचत. त्यामुळे राजूवर उंचावरून गोल करणे कठीण. राजू दोन वर्षे गोलकिपर म्हणून कॉलेजमध्ये खेळला. या काळात पहिल्या वर्षी त्याची विद्यापीठ संघात निवड झाली नाही; पण दुसऱ्या वर्षी राजूचा खेळ शिवाजी विद्यापीठ संघात निवड होण्याइतपत चांगला झाला. या संघात त्याची गोलकिपर म्हणून निवड झाली.
न्यू कॉलेजमध्ये खेळत असताना प्रॅक्टिस क्लब या नामांकित संघात त्याची निवड झाली. या आपल्या घरच्या क्लबमध्ये राजू सुमारे चार वर्षे गोलकिपर म्हणून खेळला. या चार वर्षांच्या काळात राजू सर्व स्थानिक आणि मिरज, सांगली, गडहिंंग्लज या ठिकाणच्या स्पर्धांमध्ये आपल्या गोलकिपिंंगचे चांगले प्रदर्शन केले. शेवटची दोन वर्षे राजू दिलबहार क्लबकडून खेळला.
राजूच्या वडिलांची गोलकिपर म्हणून जितकी ख्याती होती, त्याच्याहीपेक्षा ते उत्तम ‘फुटबॉल रेफ्री’ म्हणून प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. राजू दळवी या क्षेत्रातही ‘बापसे बेटा सवाई’ निघाला. ज्युनिअर संघाच्या सामन्यात राजू मुख्य रेफ्री म्हणून काम पाहू लागला; पण फुटबॉल रेफ्री म्हणून मान्यता प्राप्त करण्यास आॅल इंडिया किंंवा आंतरराष्ट्रीय पंचासमोर परीक्षा द्यावी लागते. राजूने अखेरपर्यंत रेफ्रीच्या कामाचा खडतर वसा स्वीकारला. सन १९८५ साली राज्य फुटबॉल पंच परीक्षा राजू पास झाला. कोल्हापूरमध्ये राज्यपातळीवर फुटबॉल पंच होण्याचा पहिला मान राजूचा होता. हळूहळू राजूमुळे व केएसएच्या माध्यमातून अधिकृत पंचांची संख्या वाढू लागली. प्रभाकर मगदूम, निशिकांत मंडलिक, श्रीनिवास जाधव, मंगल शिंंदे, बाजीराव मंडलिक, कै. गोविंंद जठार हे सर्व खेळाडू पंच परीक्षा उत्तीर्ण झाले. दरम्यानच्या काळात राजू कोल्हापुरातील सर्व स्पर्धांमध्ये मुख्य पंचगिरी करीत होता. तसेच त्याच्या सरस व निर्दोष पंचगिरीमुळे त्यांना बाहेरगावी स्पर्धेकरिता मोठी मागणी असे. मिरज, सांगली, गडहिंंग्लज, सातारा या ठिकाणी त्याच्याकडे उत्तम रेफ्री म्हणून आदराने पाहिले जाई. सन १९८९ साली द्वितीय श्रेणी पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने राष्ट्रीय पंच म्हणून २००१ साली कोल्हापूरच्या आजअखेरच्या फुटबॉल इतिहासात मानाचा तुरा रोवला. वॉल्टर परेरा, धनराज पिल्ले, एस. एस. शेट्टी, धनराज मोरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे आणि त्याची जिद्द व चिकाटी यामुळे राजू आता राष्ट्रीय पंच बनला. त्याने कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात चांगले रेफ्री कसे बनतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. राजू दळवी फुटबॉलसह बास्केटबॉल व क्रिकेट पंच म्हणून अधिकृत परीक्षा पास झाला असून, या दोन खेळांतही त्याने पंचगिरी केली आहे.
राजेंद्र भीमराव दळवी एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. फुटबॉलमुळे अफाट लोकप्रियता. मित्र परिवार मोठा. बोलका स्वभाव. वडिलांना न्यू पॅलेसवर कै. शहाजी छत्रपतींचा सहवास लाभला. त्याचप्रमाणे राजूला आज न्यू पॅलेसवर श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा सहवास व आधार मिळाला आहे. शाहू छत्रपतींनी शाहू विद्यालयाच्या शिक्षकेतर स्टाफवर नेमणूक करून कायमपणे सेवेत ठेवले आहे. राजू क्रीडांगणावर पंचगिरी करीत असताना त्याच्या निर्णयावर किंवा शंका घेताना खेळाडू दहा वेळा विचार करतील इतका तो निर्णय अचूक असे. या लौकिकामुळे दोन्ही संघांवर जबरदस्त वचक असे. राजू रेफ्री असला की सामना विनातक्रार पार पडणारच याचा प्रेक्षकांना विश्वास होता.
रेफ्री म्हणून काम करताना सामन्यात तुमची पहिली व्हिसल कशी वाजते, यावर तुमचा सामन्यावरील कंट्रोल ठरतो, असे राजूचे निरीक्षण आहे. त्यामुळे मी पहिली व्हिसल इतक्या दणक्यात आणि आत्मविश्वासाने वाजवितो की, त्याचे इम्प्रेशन शेवटच्या व्हिसलपर्यंत टिकून राहते, असे राजूने सांगितले.
(उद्याच्या अंकात : कै. दिलीप कोठावळे)

Web Title: 'Bapse Son Sawai' - Referee of Kolhapur - Rajendra Dalvi (Senior)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.