पेठवडगावात बिरदेव, महालक्ष्मी पालखी, पंजा भेटीतून सामाजिक ऐक्य
By admin | Published: October 25, 2015 11:11 PM2015-10-25T23:11:43+5:302015-10-25T23:30:54+5:30
५२ वर्षांनी प्रथमच आलेल्या दोन्ही पालखी पंजा भेट धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. याचा आदर्श घेण्याची गरज आहे.
पेठवडगाव : येथील महालक्ष्मी पालखी, बिरदेव पालखी, पंजा सवारी भेटीचा संगम झाला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी सपत्नीक भेट देऊन धार्मिक एकोप्याचे कौतुक केले. जयघोषात, तसेच ढोल-ताशांचा गजर, आतषबाजी, रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी, विद्युतमाळेची आकर्षक रोषणाई, भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात नगरप्रदक्षिणा झाली. यावेळी बोलताना जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा म्हणाले, ५२ वर्षांनी प्रथमच आलेल्या दोन्ही पालखी पंजा भेट धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. याचा आदर्श घेण्याची गरज आहे. सुरुवातीस घुमट चौकात महालक्ष्मी, बिरदेव पालखी येऊन थांबल्या. त्यानंतर या पालखींना भेटण्यासाठी शहरातील २१ पंजे भेटीस आले. यानंतर वाणी पेठेत सालाबादप्रमाणे भाकणूक झाली. यामध्ये अंबाबाईची नगरप्रदक्षिणा झाली.
नुक्कड कॉर्नर, चावडी, शिवाजी चौक, पाटलांचा वाडा, मराठी शाळा, मराठा समाज मंडप, सुतार गल्ली, सावरकर चौक, यादव वाडा अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीचे मानकरी, रणजित यादव, देवस्थान समितीचे अध्यक्ष दिलीपसिंह यादव, धनाजी पाटील, बिरदेव समाजाचे बाबासाहेब भोपळे, विलासराव भोपळे, सूर्याजी भोपळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)