राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:47 AM2022-08-22T11:47:50+5:302022-08-22T11:48:38+5:30
काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे.
कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी विकाऊ लोकांची सौदेबाजी झाली. खुलेआम लोकशाहीची थट्टा करण्यात आली. मतदारांनी निवडून दिले म्हणून सौदेबाजी करून त्यांनी कमाई केली. म्हणून सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी रविवारी केले.
जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे वितरण आयोजित पुरस्कार कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 'गांधीजींच्या खुनानंतर ७५ वर्षांनी त्यांची आपल्याला आवश्यकता . आहे का?' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी 'जगन फडणीस स्मृतीशोध पत्रकारिता पुरस्कार' दिल्ली येथील साहित्यिक आणि इतिहास संशोधक अशोककुमार पांडेय यांना देण्यात आला. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.
गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्था आणि लोकशाहीची खिल्ली उडविण्यात आली. काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे. बिल्कीस बानू या महिलेवर बलात्कार करून हत्या केलेले आरोपी उच्चवर्णीय असल्याने सुटल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सध्याच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभा केले जात आहे.
पांडेय म्हणाले, महात्मा गांधी यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या जातीय अस्मिता टोकदार बनवल्या आहेत. जातीय हिंसा घडवून आणले जात आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके, ओमप्रकाश कलमे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. निशिकांत चाचे यांनी आभार मानले.
समाज गप्प म्हणून
- गेल्या आठ वर्षांत संविधानात अनेक बदल करण्यात आले. जातीय हिंसा झाल्या. मॉब लिचिंगच्या घटना झाल्या,
- लोकशाहीतील संस्था डळमळीत करण्यात आल्या. तरीही समाज गप्प आहे. त्यामुळे वाईट घटना वाढत आहेत, असे मत गांधी यांनी व्यक्त केले.
अश्रू अनावर
- राजस्थानमधील दलित मुलाची माठातील पाणी प्यायल्याने हत्या झाली. तरीही समाजाकडून अपेक्षित उठाव झाला नाही.
- ही घटना सांगताना गांधी यांना अश्रू अनावर झाले. इतकी गंभीर घटना घडूनही पंतप्रधानाकडून दुःख व्यक्त केले नाही. नाटकी अश्रूही काढले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.