महापुराचे विघ्न कायम, पंचगंगा इशारा पातळी ओलांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 04:59 PM2019-09-07T16:59:43+5:302019-09-07T17:05:14+5:30
सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने महापुराचे समोर उभे ठाकलेले विघ्न गणपतीबाप्पाच्या साक्षीने दूर होईल या आशेवर दुपारनंतर पाणी फिरले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सकाळी बंद झालेला राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी पुन्हा उघडला.
कोल्हापूर: सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने महापुराचे समोर उभे ठाकलेले विघ्न गणपतीबाप्पाच्या साक्षीने दूर होईल या आशेवर दुपारनंतर पाणी फिरले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सकाळी बंद झालेला राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी पुन्हा उघडला.
चार दरवाजातून ७११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३७ फुटांवर पोहचली. महापुराची ३९ फुटाची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने नागरीकांमध्ये धास्ती वाढली असून भेदरलेल्या नागरीकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे.
६५ बंधारे पाण्याखाली गेल्याने २0 मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून गावांना पाण्याचा वेढा पडू लागला आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना पुराचा तडाखा बसणाऱ्या नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे.
शनिवारी गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना सकाळी पावसाने कांहीशी उघडीप दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, पण दुपारनंतर मात्र पावसाने जोर पकडला.
शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ५९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १२२ मि.मी पाऊस एकट्या गगनबावड्यात झाला आहे. सलग चौथ्या दिवशी तेथे अतिवृष्टी सुरु आहे. आजरा ७६, राधानगरी ६0, शाहूवाडी आणि चंदगड ५४, पन्हाळा ५२, कागल व गडहिग्लज ४२, करवीर २७ तर हातकणंगले व शिरोळमध्ये ६ ते ९ मि.मि पाऊस झाला आहे.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ सकाळी ८ वाजता ३५ फूटांवर असणारी पाणीपातळी दुपारी ४ वाजेपर्यंत ३७ फुटांवर पोहचली. बंधाऱ्यातून ४0 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यात दुपारनंतर आणखी वाढ झाली.
पुण्यात मदत व बचावकार्यासाठी आलेली एनडीआरएफची तीन पथके शिरोळ, करवीर तालुक्यात तैनात करण्यात आली. पुराचा तडाखा जास्त बसणाऱ्या चिखली, आंबेवाडी, कुरुंदवाड,निलेवाडी या शंभर टक्के बुडीत गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून नदीकाठच्या १२९ आणि पूरबाधीत ३६३ गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व यंत्रणा तैनात करण्याचे नियोजन जिल्हा आपत्ती विभागाकडून सुरु आहे.
धरणातील विसर्ग (क्यूसेकमध्ये)
- राधानगरी ७११२
- वारणा १४८३५
- तुळशी १५२१
- कुंभी ९५0
- कासारी ७५0
- काळम्मावाडी १0000
- कोयना४१५१४
- अलमट्टी १४४३१३
२४ तासात झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
हातकणंगले ९, शिरोळ ६, पन्हाळा ५२, शाहूवाडी ५४, राधानगरी ६0, गगनबावडा १२२, करवीर २७, कागल ४१, गडहिग्लज ४२, भूदरगड ५0, आजरा ७६, चंदगड ५३, एकूण ५९७