‘बार्टी’तर्फे आता पहिलीचा प्रवेशही आॅनलाईनच : प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:51 PM2020-02-13T13:51:45+5:302020-02-13T13:52:38+5:30
शासनच या मुलांचा खर्च उचलते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व उपसंचालक कार्यालयामार्फत याचे नियंत्रण होते. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोल्हापूर : दुर्बल, वंचित घटकातील बालकांच्या शिक्षणासाठी आता ‘बार्टी’ अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेनेही आपला हात पुढे केला आहे.
आरटीईअंतर्गत पहिलीसाठीची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून राबविण्यात येणार आहे. यासाठी विचारेमाळ येथील समाजकल्याणच्या कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार जिल्ह्यात दुर्बल, वंचित घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवून त्यांना मोफत शिक्षण दिले जाते. शासनच या मुलांचा खर्च उचलते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व उपसंचालक कार्यालयामार्फत याचे नियंत्रण होते. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
आता यात बार्टीनेही हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विचारेमाळ येथे कार्यरत असलेल्या समाजकल्याणच्या प्रशासकीय कार्यालयातून ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठीचे फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजपासूनच ती प्रक्रिया सुरू झाली आहे.
अहिल्याबाई सेंट्रल स्कूलमध्ये बुधवारी या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष माने, नूतन मराठी शाळेचे सचिन हावळ, पद्माराजे विद्यालयाचे अमित जाधव, सर्व शिक्षा अभियानचे अविनाश लाड उपस्थित होते.
या प्रवेशासाठीची अट
पाल्याचा जन्म जुलै २0१३ ते आॅक्टोबर २0१४ या कालावधीतील हवा.
तो महाराष्ट्राचाच रहिवासी हवा.
- लागणारी कागदपत्रे
- एक लाखापर्यंतची उत्पन्न मर्यादा
- आधार कार्ड
- जन्म दाखला
- जातीचा दाखला
आॅनलाईन फॉर्म भरताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, प्रवेशासाठी येणाऱ्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूनेच हा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रवेश कालावधीत सुट्टी व्यतिरिक्त हा कक्ष सुरू राहणार आहे.
आशा रावण, जिल्हा समन्वयक