आधार केंद्रे आता सरकारी कार्यालयात, १६ कीट जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:16 PM2019-07-19T12:16:28+5:302019-07-19T12:18:12+5:30
आधार केंद्रांतून भरमसाट पैसे आकारून नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांसह खासदार, आमदारांकडून शासन व प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना चाप बसण्याकरिता ही खासगी जागेतील आधार केंद्रे बंद करून ती सरकारी जागेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १६ कीट जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहेत. ही कार्यवाही अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.
कोल्हापूर : आधार केंद्रांतून भरमसाट पैसे आकारून नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांसह खासदार, आमदारांकडून शासन व प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना चाप बसण्याकरिता ही खासगी जागेतील आधार केंद्रे बंद करून ती सरकारी जागेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १६ कीट जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहेत. ही कार्यवाही अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून जवळपास ८० आधारकेंद्रे सुरू आहेत. या केंद्रांचे कीट सरकारी असून, ते जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या खासगी केंद्रातून जादा पैसे आकारले जात असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. ही खासगी केंद्रे काढून घेऊन ती शासनाच्या माध्यमातून चालवावीत, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधितांना आधार केंद्रांचे कीट जमा करण्याबाबत गेल्या सहा महिन्यांपूर्वी कळवून पाठपुरावा सुरू ठेवला; परंतु त्यांच्याकडून ही बाब गांभीर्याने घेण्यात आली नव्हती.
पुन्हा याबाबत तक्रारी वाढू लागल्याने माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून किट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत जवळपास १६ आधार केंद्रांची किट जमा करण्यात आली आहेत. हे किट जमा करून सर्व शासकीय कार्यालयात आधार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये आल्यावर त्यावर नियंत्रण राहणार असून मनमानी पैसे घेणाऱ्यांवर चाप बसेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. त्यामुळे ही कार्यवाही इथून पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
कार्यालयाबाहेर असणार दरपत्रक
खासगी आधार केंद्रातून होणारी लूट थांबविण्यासाठी ही केंद्रेच शासकीय कार्यालयांमध्ये स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्यालयांमध्ये ही केंद्रे आल्यावर बाहेर आधार कार्डाचे दरपत्रकच लावले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जादा पैसे घेणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रारही करता येणार आहे.
आधार केंद्रातून जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यावर अंकुश राहण्यासाठी या केंद्रातील कीट जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोईसाठी येत्या आठ-दहा दिवसांत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न राहील.
- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी