कोल्हापुरातील स्वयंम् शाळेस हवाय दातृत्वाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:42 AM2018-06-25T00:42:32+5:302018-06-25T00:42:36+5:30
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या गतिमंद मुलांना शिक्षण देऊन त्यांना स्वयंनिर्भर करणाऱ्या स्वयंम् विशेष मुलांच्या शाळेला कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा आधार हवा आहे. सध्या शाळेत १४५ विशेष गतिमंद मुले शिक्षण घेत असून त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात दानशूरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कसबा बावड्यातील न्यायालयाच्या मागील बाजूस इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने स्वयंम् विशेष गतिमंद मुलांची शाळा चालवली जाते. येथील मुलांचा विकास व्हावा, आर्थिकदृष्ट्या त्यांनी कुटुंबीयांना हातभार लावावा व स्वयंनिर्भर व्हावे यासाठी संस्था विशेष प्रयत्न करते. त्यातून ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती घडवणे, आकाशकंदील, पणत्या तयार करणे, फायली, पिशव्या तयार करणे अशा अनेक लघुउद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून मिळणारे पैसे हे विद्यार्थ्यांनाच दिले जातात.
या शाळेला शासनाच्यावतीने केवळ ४० विद्यार्थ्यांचा खर्च व चार कर्मचाºयांचा पगार दिला जातो त्यावरील १०४ विद्यार्थ्यांचा खर्च व अन्य ९ कर्मचाºयांचा पगार हा सोसायटीच्या पदाधिकाºयांच्या व दानशूरांच्या देणगीतून केला जातो. काही सक्षम पालक शक्य तितकी मदत करतात; पण बहुतांशी विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून पालकांचे हातावरचे पोट आहे. दानशूर व पदाधिकाºयांच्या मदतीवर शाळेचा डोलारा सांभाळला जातोय. येथील व्यवस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारी प्रगती पाहून अनेक पालक आपल्या विशेष मुलांना या शाळेत घालत असल्याने दरवर्षी येथील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनाला शाळेचा खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. मात्र, शासकीय निधीची आणि देणगीची मर्यादा पाहता खर्च भागवणे दिवसें-दिवस अवघड होत आहे.
फक्त पाच
हजारांची मदत...
या योजनेअंतर्गत दानशूर व्यक्तीने एका वर्षासाठी किमान एका विद्यार्थ्याचे आर्थिक पालकत्व स्वीकारायचे आहे. त्यासाठी संस्थेकडे केवळ पाच हजारांची देणगी द्यायची आहे. शाळेला ‘८०-जी’ची मान्यता आहे. या पाच हजारांत निरागस मुलांची स्वयंनिर्भरतेची स्वप्ने पूर्ण होणार आहेत.
येथे करा मदत
आपल्या रकमेचा धनादेश इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बँक आॅफ इंडिया, लक्ष्मीपुरी शााखा कोल्हापूर खाते क्रमांक : ०९००१०२००००३१८९, आयएफसीएस कोड नंबर - बीकेआयडी ००००९०० येथे जमा करू शकता. अधिक माहितीसाठी ०२३१-२६५०३६७, ९०११६५०३६७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
स्वयंम् शाळा गतिमंद मुलांना स्वावलंबी बनविण्याचे काम करते. मात्र, विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने शाळेचा खर्च भागवणे अवघड होत आहे. दानशूर कोल्हापूरकरांनी केलेली छोटीशी मदत मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यात मोलाचे योगदान ठरेल. - अमरदीप पाटील
(उपाध्यक्ष, इंडियन रेडक्रॉस सोसायटी)